भगव्याचा विरोध करणाऱ्या नतद्रष्टांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही- संजय राऊत

Sanjay Raut - Gunratan Sadavarte

मुंबई : सरकारी कार्यालयांवर भगवा ध्वज फडकवणे म्हणजे संविधानाच्या ३६२ कलमानुसार संपुष्टात आलेली राजेशाही पुन्हा प्रस्थापित करण्यासारखं आहे, अशी टीका वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांनी केली होती. तसेच शिवस्वराज्यदिनी (Shiv Swarajya Day) शासकीय कार्यालयांवर तिरंगा राष्ट्रध्वजाखेरीज अन्य कोणताही ध्वज लावू नये, अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. सदावर्ते यांच्या या मागणीबाबत शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. भगव्याचा विरोध करणाऱ्या अशा नतद्रष्ट व्यक्तींना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी सदावर्ते यांचा समाचार घेतला. राऊत आज माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, भगवा झेंडा लावणं ही महाराष्ट्राची शान आणि प्रतिष्ठा आहे. ज्या दिवसाने आम्हाला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची प्रेरणा दिली, त्याला विरोध करणारे नतद्रष्ट आहेत. अशा घुबडांची काळजी न करता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा राहील, अशी कार्यवाही सरकारने त्या लोकांवर करावी. भगवा झेंडा शासकीय कार्यालयावर फडकवणे हे आपले स्वप्न आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे. भगवा होता म्हणून तिरंगा फडकला हे ज्यांना कळत नाही, त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.

शिवस्वराज्यदिनी शासकीय कार्यालयांवर तिरंगा राष्ट्रध्वजाखेरीज अन्य कोणताही ध्वज लावू नये, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वज संहिता २००२-२००६ नुसार सरकारी कार्यालयावर फक्त राष्ट्रध्वज फडकवण्याची मुभा आहे. त्यामुळे भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गाणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. या कृतीमुळे देशातील एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते. उद्या कुणीही येईल निजामचा ध्वज लावा, मोगलांचा झेंडा लावा, पेशव्यांचा झेंडा लावा म्हणू शकतो किंवा सम्राट अशोकाचा ध्वज फडकावा असेही म्हणेल.

संविधानाच्या ३६२ कलमानुसार संपुष्टात आलेली राजेशाही पुन्हा प्रस्थापित करणारा हा निर्णय आहे. त्यामुळे असा निर्णय घेणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाद मागितली जाईल, असा इशाराही सदावर्ते यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांना दिला होता. तसेच तिरंग्याखेरीज अन्य ध्वज शासकीय कार्यालयावर लावण्यासाठी आपण उपस्थित राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button