वकिलीची दारे ‘इतरांना’ उघडल्याने गोंधळ वाढेल 

gujrat HC

Ajit Gogateकायद्याची पदवी असलेल्या (LLB) आणि वकिलीखेरीज अन्य व्यवसाय किंवा नोकरी करत असलेल्या व्यक्तीलाही राज्य बार कौन्सिलकडून व्यावसायिक वकिलीची सनद मिळण्याचे दरवाजे गुजरात उच्च न्यायालयाने खुले केले आहेत. गुजरात उच्च न्यायालयाने हा निकाल त्या राज्याच्या बार कौन्सिलच्या नियमांच्या अनुषंगाने दिलेला आहे. पण ते नियम बार कौन्सिल ऑफ  इंडियाच्या नियमांवरच आधारलेले आहेत त्यामुळे अन्य राज्यांतही हा निकाल उपयोगी पडेल, असे मानले जाते.

पूर्वी राज्य बार कौन्सिलकडे नोंदणी करून व्यावसायिक वकील म्हणून सनद मिळविण्यासाठी एलएल.बी. परीक्षा उत्तीर्ण असणे एवढीच पात्रता होती. परंतु सन २००९-१० पासून  ऑल इंडिया बार कौन्सिलने वकील म्हणून नोंदणी आणि वकिली व्यवसाय याचा मधला टप्पा म्हणून आणखी एक पात्रता परीक्षा (All India Bar Examination)सुरु केली. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय वकिली व्यवसायाची कायमस्वरूपी सनद मिळणार नाही,असा नियम केला गेला. पण ही परीक्षा देण्यासाठी बार कौन्सिलकडे वकील म्हणून नोंदणी झालेली असण्याची अट आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे कायद्याची पदवी आहे व जे वकिलीखेरीज अन्य व्यवसाय किंवा नोकरी अर्धवेळ अथवा पूर्णवेळ करत आहे त्यांना तो व्यवसाय किंवा नोकरी सोडल्याशिवाय बार कौन्सिलकडे नोंदणी करता येत नाही व नोंदणी नाही म्हणून पात्रता परीक्षाही देता येत नाही, अशी स्थिती आहे.

गुजरात उच्च न्यायालयापुढे असेच एका, ‘धरले तर चावते व सोडले तर पळते’ अशा विचित्र कोंडित अडकलेल्या महिलेचे प्रकरण आले होते. वयाची चाळीशी ओलांडलेली ही महिला पतीनिधनानंतर एकटीच तिच्या मुलाचे संगोपान करते. आधीच्या ‘बीकॉम’ पदवीनंतर २० वर्षांनी ती एलएल.बी. झाली. ती एका खासगी कंपनीत नोकरी करते व घरात ती एकटीच कमावणारी आहे. तिला व्यावसायिक वकिलीलाठीची पात्रता परिक्षा द्यायची होती. पण नोकरी सोडल्याशिवाय नोंदणी करण्यास गुजरात बार कौन्सिलने नकार दिला.

न्यायालयाने या महिलेला हंगामी नोंदणी देण्याचा व त्याआधारे परीक्षा बसू देण्याचा आदेश दिला. यासाठी न्यायालयाने बार कौन्सिलचे नियम पूर्णपणे रद्द न करता ते शिथिल केले. परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत तिचे हंगामी नोंदणी प्रमाणपत्र राज्य बार कौस्लिकडेच जमा राहील व परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच तिला ते परत दिले जाईल. दोन वर्षांत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास ते रद्द होईल, असे न्यायालयाने म्हटले.

न्यायालयाच्या या निकालाने त्या महिलेला व्यक्तिगत पातळीवर तात्कालिक न्याय मिळाला असला तरी त्याने गुंता वाढेल व  नव्या अडचणी  निर्माण होतील असे दिसते. महाराष्ट्रासह इतर राज्यातही असेच नियम आहेत. वकील म्हणून नोंदणी करण्यासाठी येणारी  व्यक्ती एलएल.बी. आहे की नाही, याची खातरजमा करणे बार कौन्सिलला सोपे आहे व तशी ती केलीही जाते. पण अशी व्यक्ती अन्य कोणता व्यवसाय किंवा नोकरी नक्की करत नाही ना, याची खात्री करण्याची कोणताही यंत्रणा बार कौन्सिलकडे नाही. ‘मी वकिलीखेरीज अन्य कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करत नाही’, असे अभिवचन पत्र त्या व्यक्तीकडून लिहून घेऊन तिची हंगामी नोंदणी केली जाते.

ही नोंदणी कायम करून व्यावसायिक वकिलीची कायमस्वरूपी सनद मिळण्यासाठी या व्यक्तीला परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. परीक्षा उत्तीर्ण न होताही ही व्यक्ती हंगामी नोंंदणीच्या आधारे दोन वर्षे वकिली करू शकते. पण जिला अशी हंगामी नोंदणी दिली आहे ती व्यक्ती परीक्षा कधी उत्तीर्ण होते किंवा मुळात उत्तीर्ण होते की नाही याची पद्धतशीर माहिती संकलित करण्याचीही व्यवस्था बार  कौन्सिलकडे नाही. परिक्षेची अट लागू होऊन १० वर्षे झाली. पण या काळात परिक्षा उत्तीर्ण न होताही हंगामी नोंदणीच्या आधारे राजरोस वकिली करणारे कित्येक वकील आजही आहेत.

ही अवस्था ज्यांनी ‘मी अन्य व्यवसाय किंवा नोकरी करत नाही’ असे अभिवचन पत्र देऊन हंगामी नोंदणी मिळविली आहे त्यांची आहे. आता न्यायालयाच्या या निकालाने त्यात ‘मी अन्य व्यवसाय किंवा नोकरी करतो’, असे उघडपणे सांगून हंगामी नोंदणी घेणाºयांची भर पडेल. तेही अन्य व्यवसाय किंवा नोकरी न सोडता ‘हंगामी’ वकिली समांतरपणे करू शकतील.  त्यातील काही परीक्षा उत्तीर्ण होतील, काही होणार नाहीत. जे परीक्षा उत्तीण होतील ते हंगामी वकिली पुढे कायमस्वरूपी सुरु ठेवण्याआधी खरंच अन्य नोकरी किंवा व्यवसाय सोडतात की नाही याचीही बार कौन्सिल खात्री करू शकणार नाही. तीच अवस्था परीक्षा उत्तीर्ण न होणाºयांच्या बाबतीतही असेल.

ज्याला वकिली करायची आहे त्याने अन्य कोणतीही व्यवधाने न ठेवता पूर्ण वेळ व मन फक्त याच व्यवसायाला देऊन वकिलीची आबव प्रतिष्ठा जपावी, या मूळ उद्देशाने हे नियम केले आहेत. वर म्हटल्याप्रमाणे उघडपणे अन्य व्यवसाय किंवा नोकरी करणाºयांचाही वकिली व्यवसायात मागच्या व पुढच्या अशा दोन्ही दारांनी प्रवेश होऊन या नियमाचा पार फज्जा उडेल.

अजित गोगटे

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER