‘दार उघड उद्धवा दार उघड’, राज्यभरातील मंदिरांसमोर भाजपच्या आंदोलनाला सुरुवात

CM Uddhav Thackeray - BJP Temple Protest

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित (Corona) रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. अशात आता राज्य अनलॉक होण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे भाजपने (BJP) बंद असलेली मंदिरं उघडण्याची मागणी उचलून धरली आहे. या मागणीसाठी राज्य राज्यभरातील मंदिरांसमोर भाजपकडून घंटानाद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राज्यातील मंदिरं, देवस्थान सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आणि अध्यात्मक समन्वय आघाडी आज घंटानाद आंदोलन पुकारले आहे.

गावागावातील मंदिरांसमोर भाजप कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. मंदिरं सुरु करण्याच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत आज राज्यभर ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन केलं जाणार असल्याचं अध्यात्मक समन्वय आघाडीतर्फे सांगण्यात आलं. बुलढाण्याच्या संग्रामपूरमधून आंदोलनाचा श्रीगणेशा करण्यात आला. मुसळधार पावसातही संग्रामपूरच्या जगदंबा मंदिरासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून घंटनाद आंदोलन करण्यात आलं.

कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील मंदिरं मागील पाच महिन्यांपासून बंद आहेत. मंदिरं दर्शनासाठी खुली करा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. केंद्र सरकारने राज्यांमधील मंदिरं खुली करण्याची परवानगी दिली आहे, पण महाराष्ट्र सरकारच अजून मंदिरं खुली करण्यास तयार नाही, असा आरोप विविध धार्मिक संस्थानांनी केला आहे.

लॉकडाऊन (Lockdown) शिथील करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारुच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या. मात्र मंदिरांचं टाळं काही उघडलं नाही, असा आरोप अध्यात्मिक समन्वय आघाडीने केला आहे. या आंदोलनात भाजपसह विश्व हिंदू परिषदही सहभागी आहे. अखिल भारतीय संत समिती, अखिल भारतीय वारकरी मंडळ, वारकरी महामंडळ, अखिल भारतीय पुरोहित संघ, जय बाबाजी भक्त परिवार यांसह वारकरी, महानुभाव, लिंगायत, जैन, शीख संप्रदायाच्या अनेक संप्रदायांची प्रमुख मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरे-स्थानक, बौद्ध विहार यांच्या प्रवेशद्वारांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान, ज्यात धार्मिक स्थळं मंदिरं आणि जीम सुरू करण्याबाबत शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संकेत दिले आहेत. राऊत यांनी गुरूवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले की, राज्यातील धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक आहे. माझ्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती राऊत यांनी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER