…तरच प्रजासत्ताक चिरायू होईल

Republic Day

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो, असं वाक्य आम्हाला लहानपणापासून प्रजासत्ताकदिनी जाहीर फलकांवर लिहिलेलं दिसायचं. त्याचा अर्थ आपला देश कायम प्रजासत्ताक रहावा, लोकशाहीत प्रजेच्या हातात सत्ता असते. त्यामुळे प्रजा म्हणजे जनता सत्ताधीश असतात आणि निवडून आलेले त्या जनतेचे प्रतिनिधी असतात कारण आपली प्रातिनिधिक स्वरूपाची लोकशाही व्यवस्था आहे. प्रजा, जनता आणि तिने निवडून दिलेले प्रतिनिधी या दोहोंचाही स्तर दिवसेंदिवस घसरत चालला आहे आणि त्यामुळेच चिरायू व्हावं, अशी ज्या प्रजासत्ताकाबद्दल आपण अपेक्षा करतो, ते खरोखर प्रजासत्ताक उरले आहे का, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे.

थांबा थांबा, प्रजासत्ताकदिन साजरा करताना नकारात्मक गोष्टींची यादी मी देणार नाहीये. प्रजासत्ताकदिन साजरा करताना केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार जाहीर केले जातात. त्यातही कालपरत्वे काही बदल झालेत आणि जीवनाची बदलती क्षेत्रंही त्यात येऊ लागलीत, हे चांगलंच आहे. पण सेलिब्रेशनच्या वेळीच थोडं आत्मचिंतन व्हावं, हेही आवश्यक आहे म्हणून प्रजासत्ताकातल्या दुर्लक्षित घटकांबद्दल थोडं सांगणार आहे.

पुण्यासारख्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त जादूगार प्रसाद कुलकर्णी यांनी डोळे बांधून मोटारसायकल चालवून दाखवली. तेही वाहतुकीचे नियम पाळून. त्याबद्दलची बातमीही वृत्तपत्रातून प्रसारित झालीय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुलकर्णी यांनी डोळे बांधून सारसबाग ते शनिवारवाडा हे अंतर चार सिग्नल पाळत पार केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजकांनी दिलेली माहिती आणि ती म्हणजे दिव्यांग व्यक्तींचा अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण खूप कमी आहे कारण ते सिग्नल आणि एकूणच वाहतुकीचे नियम पाळतात. त्याउलट कोणत्याही प्रकारचं साधं किंवा दिव्य व्यंग नसलेले मात्र अपघातांमधे मोठ्या संख्येने प्राण गमावतात आणि त्यात बहुतांश वेळा वाहतुकीच्या नियमांचा भंग, हे कारण अंतर्भूत असते. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांमधे वाहतुकीच्या नियमांबद्दल जागृती व्हावी, यासाठी कुलकर्णी यांनी हे धाडस केले होते.

दिव्यांग वाहतुकीचे नियम पाळतात पण दिव्यांगांसाठी सरकारी नोकऱ्यांमधे असलेले ३ टक्क्यांचं आरक्षण मात्र कधीच पाळलं जात नाही. सध्याच्या राज्य सरकारमधे मंत्री असलेले बच्चू कडू दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते आहेत. दिव्यांगांवरचा अन्याय त्यांना सहन होत नाही आणि ते प्रसंगी संताप होऊन कायदाही हाती घेतात. कायदा करण्याचं काम करणारे बच्चू कडू आपल्या व्यवस्थेत दिव्यांगांना हेलपाटे मारावे लागतात, त्यांना त्यांच्या हक्कासाठी सरकार दरबारी खेटे घालावे लागतात, यामुळे अस्वस्थ होतात. दुसरीकडे व्यंग नसलेले कायदे पाळत नाहीत. हा विरोधाभास समाजातून नष्ट व्हावा, यासाठी व्यंग नसलेल्यांनी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे.

समाजामधे कोणत्याही प्रकारचं व्यंग असलेल्या दिव्यांगांसंबंधीची जाणीव निर्माण व्हायला हवी. तीच गोष्ट विविध प्रकारच्या मतिमंदत्वांनी ग्रस्त व्यक्तींची आहे. त्यात वैद्यकीयदृष्ट्या काही फरक आहेत पण त्या सर्वांना समाजाकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीत मात्र काहीही फरक नाही. प्रजासत्ताकदिन साजरा करताना आपल्या अवतीभोवती असलेल्या कोणत्याही प्रकारच्या दिव्यांगांबद्दल कणव, सहानुभूती यापेक्षाही ही देखील माणसं आहेत आणि त्यांना माणुसकीची वागणूक मिळाली पाहिजे, याची खूणगाठ लौकिकार्थाने ज्यांना अव्यंग समजले जाते, त्यांनी बाळगायला हवी.

दिव्यांग आणि सर्वसामान्य अव्यंग, यांनी काय करायला हवं ही अपेक्षा ठीक आहे. पण प्रजासत्ताकात निवडून येऊन विविध ठिकाणी सत्तेवर असलेल्या दिव्य घटकांनी काय करावं…त्यांनीही प्रजासत्ताकातल्या या दिव्यांग घटकांबद्दल आपलं कर्तव्य ओळखावं आणि फक्त मतपेटीतून व्यक्त होणारेच महत्त्वाचे आहेत, हा समज सोडून द्यावा.

दिव्यांग नियतीशी संघर्ष करत आहेतच आणि प्रजासत्ताकातही आपला वाटा नियमांचे पालन करून उचलताहेतच. प्रश्न आहे तो तथाकथित अव्यंगांनी आणि त्यांच्या निर्दोष नसलेल्या निवडीतून सत्तास्थानांवर जाणाऱ्यांच्या दृष्टीचा. त्यांना दिव्यांग समाजघटकांकडे पाहण्याची दिव्य दृष्टी लाभली तरच प्रजासत्ताक खऱ्या अर्थानं चिरायू होईल.

शैलेन्द्र परांजपे

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER