युतीसाठी एमआयएमनेच पुढाकार घ्यावा, वंचितचे दार सदैव उघडे – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

पुणे : एमआयएमसाेबतची युती आम्ही तोडलेली नाही. त्यांनीच युती तोडल्याचे जाहीर केले आहे. मात्र पुन्हा युती करण्यासाठी एमआयएमनेच पुढाकार घ्यावा. त्यासाठी वंचितचे दरवाजे सदैव उघडे आहेत, असे स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिले. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी आंबेडकर म्हणाले की, पुन्हा युती करण्यासाठी एमआयएमने वंचितच्या समितीशी बाेलणी चालू ठेवावी.

अनेक मुस्लिम संघटनांनी त्या वंचितसाेबत असल्याचे आम्हाला सांगितले आहे, असेही ते म्हणाले. तसेच येणाऱ्या निवडणुका या आम्ही विकासाच्या मुद्यावर लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात काही पक्ष हे धर्माच्या नावावर तर काही पक्ष हे धर्मनिरपेक्षतेच्या नावावर निवडणूक लढवत असून निवडणुका या विकासाच्या मुद्यावर लढवल्या गेल्या पाहिजेत, असेही मत आंबेडकर यांनी व्यक्त केले. राज ठाकरेंबाबत बाेलताना ते म्हणाले, राज ठाकरेंनी लाेकसभेला अनेक विकासाचे मुद्दे उचलून धरले; मात्र त्यांच्या पक्षाने निवडणूक का लढवली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो, असेही ते म्हणाले.