इथे फक्त मराठी माणसाचीच ‘राज’वट असेल! मनसेचा अ‍ॅमेझॉनला इशारा

Raj Thackeray & Amazon

मुंबई : अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने (MNS) मोहीम सुरू केली. मनसेच्या या वादात अ‍ॅमेझॉनने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना नोटीस बजावल्यानंतर ने इशारा दिला, ”महाराष्ट्र सैनिकांनी मुजोरांना कसे प्रत्युत्तर दिले याचे इतिहासात दाखले आहेत आणि भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील.

राज ठाकरे यांना आज दिंडोशी न्यायालयाने नोटीस बजावली. न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. यानंतर आक्रमक होत मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून बजावण्यात आले, “व्यापारी संकेतस्थळांच्या तंत्रप्रणालीमध्ये इतर भारतीय भाषांप्रमाणे मराठीचाही अंतर्भाव करावा म्हणून मनसेने आग्रही पाठपुरावा केला. काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला, तर काहींनी चालढकल केली. सणासुदीत कुणाच्याही व्यवसायाला फटका बसू नये म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी संयम बाळगला.

पण त्यानंतरही महाराष्ट्रात व्यापार करताना ‘मराठीचा अंतर्भाव करायला आम्ही बांधील नाही’ अशी मुजोरीची भाषा केली जाणार असेल आणि त्यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खटला भरला जाणार असेल तर महाराष्ट्र सैनिकांनी मुजोरांना कसे प्रत्युत्तर दिले याचे इतिहासात दाखले आहेत आणि भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील. महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच ‘राज’वट असेल! असा इशारा मनसेने दिला.

वाद

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अ‍ॅप सुरू करावे, अन्यथा दिवाळी ‘मनसे स्टाईल’ने होईल असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER