‘फक्त भारतातच करतात आक्रमण करणाऱ्यांचा सन्मान!’ तारिक फतेह यांचा टोमणा

Tarek Fatah

आग्रा येथे बांधण्यात येत असलेल्या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केली. उत्तरप्रदेश सरकारच्या या निर्णयानंतर मुघलकालीन इतिहासावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वरिष्ठ पत्रकार आणि लेखक तारिक फतेह (Tarek Fatah) यांनी टोमणा मारला होता – जगामध्ये असा कोणताही देश नाही जो त्यांच्यावर आक्रमण केलेल्या लोकांचा सन्मान करतो; असे केवळ भारतामध्येच होते! तारिक फतेह हे जन्माने पाकिस्तानी आहेत. सध्या कॅनडात राहतात. ते इस्लाममधल्या कुरितींवर कठोर टीका करतात.

भारतीय संस्कृतीबाबत अभिमान बाळगतात. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की – जे लोक भारत लुटण्याच्या उद्देशाने आले होते त्यांना आज आपण बादशाह संबोधतो! त्यांच्यासंदर्भातील उत्सव साजरे करतो. बाबरचा जन्म भारतातील नाही. त्याचा तर मृत्यूही भारतात झाला नाही. बाबरने भारतामध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले. लाखो लोकांची हत्या केली. त्याला हिंदुस्तानचा बादशाह समजणे चूक आहे. ताजमहाल भारतीयांनी बांधला आहे. जगामध्ये असा कोणताही देश नाही जो त्यांच्यावर आक्रमण केलेल्या लोकांचा सन्मान करतो. असे केवळ भारतामध्येच होते ! मुघलांनी शीख, हिंदू, मुस्लीम शिया पंथाच्या लोकांवर अत्याचार केले. दिल्लीतील कुतुबमिनार ही वास्तू २६ जैन मंदिरे उद्ध्वस्त करून बांधण्यात आली आहे. त्यामुळे कुतुबमिनार उभारल्याचा आनंद आपण साजरा करू शकत नाही, असे फतेह म्हणाले. भारताला आधी सुलतानांनी उद्ध्वस्त केले. सुलतान राजवटीमध्ये येथील लोकांच्या हत्या करण्यात आल्या. या उलट भारतीयांनी स्वत:च्या देशात ‘मुगल-ए-आजम’सारखा चित्रपट बनवला. ‘मुगल’ शब्दच दूषित आहे.

मुगलांना त्यांच्या मूळ प्रांतामध्ये फारसे काहीच हाती लागले नाही, मग तैमूरची ही पिल्लावळ भारतामध्ये आली आणि त्यांनी भारतामध्ये लूटमार केली, असे फतेह सांगतात. उल्लेखनीय म्हणजे याआधी केंद्रीय संस्कृती तसेच पर्यटनमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हेसुद्धा कुतुबमिनारसंदर्भात बोलले आहेत. गेल्या वर्षी कुतुबमिनारमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते म्हणाले होते – २७ मंदिरे पाडून ही वास्तू उभारण्यात आली आहे आणि ती जगभरात आपल्या संस्कृतीची ओळख आहे !

आग्रा येथे बांधण्यात येत असलेल्या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची गोष्ट करताना योगी आदित्यनाथ म्हणाले – गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना नव्या उत्तरप्रदेशात काहीही स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळेच आता आग्रा येथे बांधण्यात येणारे हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER