भ्रष्टाचार आरोपांच्या सखोल तपासानेच लोकांचा न्यायसंस्थेवरील विश्वास टिकेल

Mumbai Hc & Court order
  • दंडाधिकार्‍यास अटकपूर्व जामीन नाकारताना हायकोर्टाचे निरीक्षण

मुंबई : न्यायसंस्थेतील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे लोकांचा न्यायसंस्थेवरील विश्वास डळमळित होऊ नये यासाठी अशा प्रकरणांचा पोलिसांना सखोल तपास करण्यास वाव द्यायला हवा, असे निरीक्षण नोंदवत एका आरोपीकडून अनुकूल निकाल देण्यासाठी तीन लाख रुपयांची लांच मागितल्याचा आरोप असलेल्या एका महिला प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाºयास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला.

अमूल डेअरीसाठी दूध संकलन करणाºया स्वप्निल मधुकर शेवकर यांनी नोंदविलेल्या फिर्यादीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पुणे जिल्ह्यातील मावळ येथील तत्कालिन प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी अर्चना जतकर यांच्याविरुद्ध गेल्या जानेवारीत गुन्हा नोंदविला आहे. ‘एसीबी’ने टाकलेल्या धाडीत जतकर यांच्यावतीने लाच स्वीकारताना शुभावरी गायकवाड नावाच्या महिलेस ‘रंगेहाथ’ पकडले गेले होते.

या प्रकरणात अटक होण्याच्या वतीने जतकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळताना न्या. सारंग कोतवाल यांनी म्हटले की, याचिकाकर्त्या एका खूप जबाबदारीच्या पदावर होत्या व त्यांच्यावरील आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता त्याचा सखोल तपास व्हायला हवा. अशा घटनांमुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळित होऊ नये यासाठी तपासी यंत्रणेला या आरोपांचा तपास अगदी मुळात शिरून करू द्यायला हवा.

तक्रारदार शेवकर यांच्या तक्रारीवरून धाड टाकण्यापूर्वी त्यांच्या कथनातील खरेपणाची शहानिशा करण्यासाठी ‘एसीबी’ने गायकवाड व जतकर यांच्यात टेलिफोनवर झालेली १४७ संभाषणे रेकॉर्ड केली होती. त्याचा संदर्भ देत न्या. कोतवाल यांनी निकालात म्हटले की, टेलिफोनवरील या संभाषणांवरून तरी याचिकाकर्तीचा यातील सहभाग प्रथमदर्शनी स्पष्ट दिसतो. त्याच्यात आणि सहआरोपी गायकवाड यांच्यातील संबंध नेमके कसे होते व या दोघींनी आणखीही कुठल्या प्रकरणात असे पैसे घेतले होते का, याचा छडा लावण्यासाठी जतकर यांना कोठडीत घेऊन त्यांचा सविस्तर जाबजबाब घेण्याची गरज आहे.
जतकर यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी असा युक्तिवाद केला की, सहआरोपी गायकवाड हिने परस्पर हे पैशाचे व्यवहार केले आहेत.

जतकर यांना ११ महिन्यांचे लहान मूल आहे. त्यांचे पती मुंबईत नोकरी करतात. त्यामुळे मुलाला सांभाळण्यासाठी बाई शोधत असताना त्या गायकवाड यांच्या संपर्कात आल्या होत्या. परंतु सहाय्यक प्रॉसिक्युर एस. एच. यादव यांनी जतकर व गायकवाड यांच्यातील संभाषणामधील ठराविक उतारे दाखवून न्यायालयास सांगितले की, जतकर दाखवतात तेवढ्या साळसूद नाहीत.

न्या. कोतवाल यांनी अटकपूर्व जामिनाच्या बाबतीत जतकर यांना जराही दया दाखविली नाही. मात्र त्यांना अटक झाल्यास त्यांच्या निष्पाप अर्भकाची हेळसांड होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली. जतकर यांना अटक केली गेल्यास त्यांचे लहान मूल त्यांच्यासोबतच राहू द्यावे व त्यासाठी जतकर यांना तुरुंगात योग्य त्या सुविधा दिल्या जाव्यात, असे त्यांनी निकालपत्रात नमूद केले.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER