९ लाख रुपयांचा ऑनलाईन दरोडा; मुलाच्या हातात मोबाईल देण पडल महाग

Phone Pe - Online Fraud

नागपूर : नागपूरमधील (Nagpur) पंधरा वर्षांच्या धीरज या मुलाने वडिलांच्या मोबाईल फोनमधील ‘फोन पे’ अॅपची ट्रान्झॅक्शन लिमिट वाढवण्याचा प्रयत्न केला. गुगलवरुन ‘फोन पे’ अॅपची चुकीची लिंक वापरली आणि ऑनलाईन ठगांनी त्या खात्यातून सुमारे ९ लाख रुपये लंपास केले!

अशोक मनघटे वीज मंडळात कर्मचारी आहेत. घराचे बांधकाम करण्यासाठी त्यांनी नुकतेच कर्ज काढले होते. दिवाळी पूर्वी त्यांचा मुलगा धीरजला एका मोबाईल अॅमार्फत पैशांचे काही व्यवहार करायचे होते. त्याने ‘फोन पे’ अॅपचा कस्टमर केअर नंबर गुगलवर सर्च केला. त्याला नंबर दाखवणारी एक लिंक दिसली. ती ऑनलाईन ठकांनी तयार केलेली खोटी लिंक होती. धीरजने तिथे नमूद केलेल्या नंबरवर फोन केले. फोनवर एकाने त्याला ‘फोन पे’च्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले. ठकबाजाने धीरजकडून आवश्यक माहिती घेतली. त्यानंतर ठगाने ठगबाजाने धीरजकडून एक वेगळं अॅप मोबईलमध्ये इन्स्टॉल करुन घेतल. धीरजने ते अॅप डाऊनलोड करताच धीरजच्या हातातल्या मोबाईलची सूत्रे त्या ठगाकडे गेली! त्याने धीरजच्या वडिलांच्या अकाऊंटमधून एकापाठोपाठ एक ‘ऑनलाईन ट्रान्झॅक्शन’ करत पैसे दुसऱ्या अकाऊंटमध्ये वळते करणे सुरू केले.

मध्य रात्रीच्या सुमारास झालेल्या या प्रकाराने धीरज घाबरला. त्याने ही माहिती वडिलांना दिली. त्यांनी लगेच एटीएम कार्ड ब्लॉक केले. मात्र, त्यानंतर ही ठगांनी त्यांच्या डोळ्यादेखत आणखी ७ लाख; एकूण ८ लाख ९५ हजार रुपये ऑनलाईन आपल्या अकाऊंटमध्ये जमा केलेत. घरासाठी घेतलेल्या कर्जाचे पैसे ठगांनी असे ऑनलाईन हातोहात लंपास केल्याने अशोक मनघटे हवालदिल झाले आहेत.

पोलिसांनी या प्रकरणी रीतसर तक्रार नोंदवली असून तपास सुरु केला आहे. मात्र, आर्थिक व्यवहार करणारे अॅप मुलांच्या हाती सोपवू नका. शक्यतो आर्थिक व्यवहाराचे अॅप असलेले मोबाईल मुलांपासून दूर ठेवा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

अशोक मनघटे यांनी घराच्या बांधकामासाठी चार दिवसांपूर्वीच गृहकर्ज घेतले होते. त्याच पैशावर त्यांचे स्वप्न अवलंबित होते. आता घराची बांधणी तर दूर कर्जाचे पैसे कसे चुकवावे असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार किती सावधगिरीने करणे गरजेचे आहे हे अधोरेखित झालेच आहे. शिवाय लहान मुलांनी आम्हाला सर्व काही समजते या अविर्भावात पालकांच्या मोबाईलवरुन व्यवहार केल्याची किती मोठी किंमत संपूर्ण कुटुंबाला चुकवावी लागते हे ही या प्रकरणातून समोर आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER