शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन तारण कर्ज उपलब्ध – बाळासाहेब पाटील

राज्य वखार महामंडळ आणि राज्य सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने

Balasaheb Patil

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाताना काही अडचणी आल्या किंवा शेतमालास योग्य किंमत मिळत नसल्यास नजीकच्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक करता यावी आणि प्राप्त गोदाम पावतीवर ऑनलाईन पद्धतीने तारण कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य वखार महामंडळ आणि राज्य सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

श्री.पाटील म्हणाले, ही नाविन्यपूर्ण योजना प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी प्रथमत: राबविण्यात येत आहे व यासाठी मिळणारा प्रतिसाद पाहून इतर बँकांच्या माध्यमातूनही सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

राज्य वखार महामंडळाची राज्यात विविध ठिकाणी गोदामे असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य तसेच शेतमाल, औद्योगिक मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात येते. गोदामातील साठवणुकीवर वखार पावती देण्यात येते. सदर वखार पावती वखार अधिनियम, 1960 नुसार पराक्रम्य (Negotiable) असून त्यावर बँकेमार्फत तारण कर्ज उपलब्ध होते.

वखार पावतीवर शेतकऱ्यास प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतू या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शेतकरी वखार महामंडळाच्या संगणकीय प्रणाली आधारे ऑनलाईन पद्धतीने बँकेस तारण कर्जासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करु शकतात.

तसेच शेतकऱ्यास यासंबंधिचे मोबाईल ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन त्याच्या स्मार्टफोनच्या आधारे मराठी मध्ये अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. स्मार्टफोनद्वारे शेतकऱ्यास आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन पाठविता येतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा बँकेत जाण्याचा वेळ व पैसा वाचेल.

शेतकरी ठेवीदारांनी ऑनलाईन तारण कर्जासाठी अर्ज केल्यानंतर बँकेकडून ह्या अर्जाची छाननी केली जाईल व पात्र शेतकऱ्यास वखार पावतीवरील शेतमालाच्या किंमतीच्या 70 टक्के कर्ज बँकेकडून शेतकऱ्यांच्या बँक खाते आरटीजीएस अथवा एनएफटी द्वारे जमा केले जाईल. शेतकऱ्यास ऑनलाईन कर्जाची सुविधा एक ते दोन दिवसात उपलब्ध करुन दिली जाईल.

तारण कर्जासाठी व्याजदर 9 टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे. तारण कर्जाची मर्यादा रुपये 5 लाख प्रति शेतकरी एवढी असून वखार महामंडळाकडून शेतकऱ्यास साठवणूक भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यास प्रत्यक्ष बँकेत न जाता वेळोवळी कर्जाची रक्कम व त्यावरील व्याज याची माहिती त्याच्या मोबाईलवर नोटीफिकेशनद्वारे दिली जाईल आणि शेतमाल विक्री करावयाचा असल्यास बँकेचे मुद्दल व त्यावरील व्याज ऑनलाइन भरणा केल्यावर शेतकऱ्याच्या वखार पावतीवरील बोजा कमी करण्यात येईल.

यामध्ये ब्लॉकतंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने तारण कर्ज देणे, त्याची परतफेड, सध्याचा बाजार भाव, उपलब्ध अन्न धान्य साठा या सर्व गोष्टी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाईन होणार असल्याने शेतकऱ्याचा मोठा फायदा होणार आहे आणि ऑनलाईन तात्काळ कर्ज उपलब्ध झाल्याने शेतकरी बांधवांची वेळेची बचत तसेच कागदपत्रांसाठीच्या प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे, असेही श्री.पाटील यांनी संगितले


Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER