आजपासून औरंगाबादेत ऑनलाईन मद्यविक्री

Online liquor sale in aurangabad
  • आता मुळ किंमतीत मिळणार मद्य
  • शेकडो मजूरांच्या हाताला काम मिळणार
  • परवानाधारकांनी एकाचवेळी खरेदी करण्याची मागणी

औरंगाबाद : औरंगाबादेत ऑनलाईन मद्यविक्रीला मंजूरी मिळाल्याने मद्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे अनेक मजूरांच्या हाताला काम देखील मिळणार आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारपासून औरंगाबाद शहरात ऑनलाइन तर ग्रामीण भागात थेट मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. दरम्यान, ज्या मद्यप्रेमींकडे परवाना आहे. अशांनी एकाचवेळी साठ्याची मागणी करावी, असेही मद्य दुकानदारांचे म्हणणे आहे. जेणे करुन वारंवार मद्य खरेदीसाठी त्रास होणार नाही.

शहरातील कंटनेमेंट झोन वगळता अन्य भागातील मद्यविक्रीच्या दुकानदारांना १ जूनपासून ऑनलाइन मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. परवानाधारकांनाच ऑनलाइन मद्य खरेदी करता येणार आहे. ज्या ग्राहकांकडे परवाना नाही, अशा व्यक्तींना मद्यविक्रेत्यांकडून परवाना घेता येऊ शकतो. शहरातील ग्राहकांना त्याच्या नजीकच्या मद्यविक्रेत्याच्या व्हॉट्सअप क्रमांक, मोबाइलवर मेसेज पाठवून अथवा थेट दूरध्वनीवर मागणी करता येऊ शकते.

त्यासाठी दुकानदारांनी डिलिव्हरी बॉयची व्यवस्था केली आहे. या डिलिव्हरी बॉयची वैद्यकीय तपासणी दुकानदारांकडून करण्यात येत आहे. मद्याची डिलिव्हरी करताना बॉयला मास्क, हँडग्लोज, हेडकॅप, सॅनिटायझर्स वापरणे अनिवार्य आहे. शहरी भागात सकाळी दहा ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत मद्याची दुकाने उघडी ठेवण्याची तर ग्रामीण भागात सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मद्यविक्रीच्या दुकानांवर दोन ग्राहकांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर राखणे आवश्यक असेल. दुकानावर गर्दी होणार नाही, याची काळजी ग्रामीण भागातील मद्यविक्रेत्यांनी घ्यायची आहे. शहरी भागात एकुण ३२ मद्याची दुकाने आहेत.

एकावेळी २४ युनिटची मंजूरी

मद्य दुकानातील डिलिव्हरी बॉयला एकावेळी २४ युनिट घेऊन जाण्याची मंजूरी देण्यात आली आहे. दुकानदारांकडून वेळोवेळी जंतूनाशक फवारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी काही दुकानदारांनी फवारणी मशिन आणली आहे.

साडेतीनशे मजूरांना रोजगार

गेल्या दोन महिन्यांपासून मद्याची दुकाने बंद होती. त्यामुळे चोरट्या मार्गाने चढ्या भावात मद्याची विक्री सुरू होती. मात्र, सोमवारपासून ऑनलाईन मद्यविक्रीला सुरूवात होणार असल्याने सुमारे साडेतीनशे मजूरांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती दुकानदारांनी दिली.
विनाशुल्क घरपोच सुविधा

एका परवान्यावर ग्राहकाला १२ युनिट ऑनलाईन खरेदी करता येऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांनी एकाचवेळी साठा करावा. जेणे करुन आपल्याला वारंवार मद्य खरेदीसाठी त्रास होणार नाही. तर प्रशासनाने देखील मद्य दुकानदार व डिलिव्हरी बॉयला सहकार्य करावे. घरपोच विनाशुल्क मद्य पुरवठा केला जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER