कांदा घसरला; शेतकरी संकटात

onions_prices_down

नागपूर : विदर्भासह मराठवाड्यातील कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. गत आठवड्यात टोमॅटोचे भाव घसरले होते तर आता कांदा घसरल्याने सध्या शेतकऱ्यांवर चहूबाजूंनी संकट आले आहे. घाऊक म्हणजेच ठोक बाजारात ज्या कांद्याला १००० ते ११०० रुपये क्विंटल भाव मिळत होता. त्याच कांद्याला ४०० ते ६०० रूपये क्विंटल भाव मिळत आहे. कांदा उत्पादनात वाढ झाल्याने नागपुरातील कळमना बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली आहे. दररोज ६० ट्रक कांदा उपराजधानीत येत असल्याची माहिती घाऊक व्यापारी राजू वैरागडे यांनी दिली.

शेतकऱ्यांनी साठवलेल्या उन्हाळी कांद्यासोबतच, आता लाल कांदाही बाजारात येत आहे. नवीन कांद्याची आवक वाढल्यामुळे लागोपाठ भावात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आधीच टोमॅटोला मिळत असलेल्या मातीमोल दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाला असून, आता शेतकऱ्यांना कांदासुद्धा रडवणार कि काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकंदर परिस्थितीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वागल्या आहेत.

विदर्भातील अनेक जिल्ह्यात यंदा पाऊस फार कमी प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव इतके कोसळले, की काही शेतकऱ्यांनी अक्षरशः त्यांचा माल रस्त्यावर फेकून दिला. तर काहींनी जनावरांना खाऊ घातला होता. टोमॅटो पाठोपाठ आता कांद्यावर असेच संकट आले आहे. दररोज भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांना कांदाही जनावरांना खाऊ घालावा लागणार काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नागपुरातील घाऊक व्यापारी राजू वैरागडे म्हणाले, गत आठवड्यात कांद्याला ७५० ते १००० रुपये प्रति क्विंटल भाव होता. तर यात सध्या आवक वाढल्याने घसरण झाली. बुधवारी हाच कांदा ४०० ते ५५० (लाल), ४०० ते ६०० (पांढरा) रुपये क्विंटल प्रमाणे मिळत आहे. ठोक दरात १० ते १२.५० रुपये प्रति किलो तर किरकोळ विक्रेते १२-१५ रुपये किलो प्रमाणे कांदा विक्री करीत आहेत. बाजारपेठेत कांद्याची आवक दुपटीने वाढली असून २०-२५ ऐवजी तब्बल ६० ट्रक कांदा कळमन्यात येत आहे. एका ट्रकमध्ये १६ ते २५ टन कांदा असतो. हा कांदा विदर्भासह मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात येतो. मराठवाड्यात कांदा उत्पादन सर्वाधिक होते, हे विशेष.