ऐन सणासुदीच्या दिवसाला कांद्याचे दर नव्वदीपार

onion-price-increases

मुंबई : परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले असताना आता सामान्यांना कांद्याच्या दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळी कांद्याचा (onion) साठा संपत चालला व नवीन पीक येण्यास विलंब लागणार असल्यामुळे देशात सर्वत्र कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. मागणीपेक्षा आवक कमी होत असल्यामुळे बाजारभाव वाढत आहेत. मुंबई महानगरात कांद्याचे दर प्रति किलो ७०-९० रुपयांवर पोचले, तर पुण्यात ५० ते ७० रुपयांच्या घरात पोहोचला.

राज्य सरकारने हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी दिल्यामुळे कांद्याच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली. त्यामुळे लवकरच कांदा शंभरी गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास सामान्य लोकांच्या घरातील बजेट कोलमडू शकते.

उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालला असून अतिवृष्टामुळे खरिपाच्या कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. नवीन पीक येण्यासाठी वेळ असल्यामुळे उपलब्ध कांद्याचे दर वाढले असून अशीच स्थिती राहिली तर दसऱ्यापर्यंत किरकोळ मार्केटमध्ये कांदा शंभरी पार करण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता दर नियंत्रणात ठेवण्यासाठी एपीएमसी बाजारात इराणवरून कांद्याची आयात करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई बंदरात ६०० टन इराणी कांदा दाखल झाला आहे. यातील २५ टन कांदा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येईल. त्यामुळे कांद्याचे दर पूर्ववत होतील, असा अंदाज आहे.

दरम्यान, राज्यातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या नाशिकच्या लासलगावमध्ये पाच दिवसांपूर्वी कांद्याचा क्विंटलचा दर सरासरी ४३०० रुपये होता. सोमवारी कांद्याला क्विंटलमागे किमान १२०० ते कमाल ७०८२, तर सरासरी ६४०० रुपये भाव मिळाला. उपाहारगृहे, रेस्टॉरंट सुरू झाल्याने कांद्याची मागणी वाढणे हे दरवाढीचे प्रमुख कारण असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER