एक ते चार काम बंद. छे छे, गेले ते दिवस…

Chandrakant Patil

Shailendra Paranjapeमध्य प्रदेशात निवडणूक प्रचारात घसरलेली जीभ गाजली. त्या दोन दिवसात इतरही काही लोकांची जीभ घसरली. पिंपरी-चिंचवडमधे रविवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुण्यावर म्हणजे पुणेरी लोकांवर टिप्पणी केली. पुण्यात दुपारी एक ते चार झोप घ्यायची असल्याने काम होत नाही, असं ते म्हणाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालंय.

वास्तविक, चंद्रकांत पाटील कोथरूड या पुण्यातल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. कोथरूड मतदारसंघात पूर्वाश्रमीचे सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठ या पुणेरी वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मंडळींची लोकसंख्या मोठी आहे. त्यांच्या या व्यवच्छेदक लक्षणाचा त्यांच्याच आमदाराने असा उल्लेख केलेला त्यांना कसा आवडेल…

पुणे या शहराची काही वैशिष्ट्य आहेत. जुनं पुणं तुलनेनं खूपच छोटं होतं. दोन-तीन किलोमीटरच्या त्रिज्येत संपणारं शहर आता पंचवीस तीस किलोमीटर त्रिज्येचं झालंय. केवळ आणि केवळ नेटिव्ह किंवा फार तर पुणे जिल्ह्यातून आलेल्यांचं पुणं शहर आता खऱ्या अर्थानं कॉस्मोपॉलिटन झालंय. पण एकदा कानफाट्या नाव पडलं की माणूस कायमचा कानफाट्या ठरतो, हे माणसाला लागू आहे तसंच पुणं शहराच्या बाबतीतही झालंय.

शहर वाढलं तसं शहराची डेमोग्राफीही बदलली. म्हणजे पुण्यात राहणाऱ्या माणसांमधे पुण्याबाहेरच्या लोकांची संख्या खूपच वाढलीय. मुंबईसारखेच पुण्यात आणि इतर महानगरांमधेही नेटिव्ह किंवा मूळ लोक कमी होतात तसंच पुण्यातही अस्सल पुणेरी पुणेकर कमीच होऊ लागलेत. स्वतः चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असूनही आणि शिक्षण मुंबईत घेऊनही कोथरूडसारख्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येतात, ही एकच गोष्ट कोथरूडचे लोक तरी किमान दुपारी झोपत नाहीत, हे सिद्ध करणारी आहे.

पण पिंपरी-चिंचवडच्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या दुपारी झोपण्याच्या अस्तंगत झालेल्या गोष्टीचा उल्लेख केला. पंतप्रधान २२ तास काम करतात म्हणून यशस्वी झालेत, असं सांगताना पुण्यात लोक दुपारी एक ते चार झोपतात आणि पुण्यात एक ते चार काम बंद असतं, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. पुण्याच्या महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. त्यांचाच महापौर आहे आणि स्थायी समितीसह महत्त्वाची पदंही भाजपाकडेच आहेत. असं असताना पुण्यात दुपारी तीन तास काम होत नाही, ही भाजपा अध्यक्षांची टिप्पणी विरोधकांच्या हाती दिलेलं कोलीत ठरणार नाही का…

अशीच टीका चंद्रकांत पाटील सांगलीत जाऊन कोल्हापूरवर करू शकतील का, याचा विचार करायला हवा. सोडलेला बाण एकवेळ परत येईल पण तोंडातून गेलेला शब्द परत घेणं अवघड असतं. धरणात पाणी नाही तर मी काय….असे शब्द अजित पवार यांनी उच्चारले होते आणि ते त्यांना आयुष्यभर पुरतील, अशी प्रतिक्रिया स्वतः शरद पवार यांनी खासगीत दिली होती. तसंच पाटील यांच्याबाबत होणार नाही ना…

लहानपणी वक्ता दशसहस्त्रेषु…याबद्दलचे संस्कृत सुभाषित शाळेत शिकवले गेले होते. पण चांगला वक्ता होण्यासाठी मुळात काय बोलायचं नाहीये, ते कळतं तो वक्ता, असं जुन्या पिढीतली शहाणी माणसं सांगायची. त्याचीही आठवण झाली. आता कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांनी दुपारी एक ते चार झोपणाऱ्या पुणेकरांवर केलेली टिप्पणी त्यांच्या मतदारांना आवडते की नाही, हे काळच ठरवेल.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER