शाहीनबाग : एक रस्ता वाहतुकीसाठी खुला

one-road-of-shaheen-bagh-opened-after-two-months-delhi

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा आणि नागरिकत्व नोंदणी या दोन कायद्यांविरोधात रस्ता अडवून आंदोलन करण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या शाहीनबाग येथील ओखला आणि सुपर नोवा हा भाग शुक्रवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पोलिसांनी या रस्त्यावरील अडथळे हटवले. कालिंदीकुंजला जोडणारा रस्ता मात्र अद्याप बंद आहे. या रस्त्यावर अजूनही आंदोलन सुरू आहे. हा रस्ता १३ डिसेंबरपासून बंद आहे.

या आंदोलनामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. फरीदाबाद जाण्यासाठी प्रवाशांना डीएनडीच्या रस्त्याने काही किलोमीटरचा फेरा घेऊन फरीदाबादला जावे लागते. शाहीनबाग आंदोलनामुळे बंद झालेला रस्ता खुला करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनाला बसलेल्या नागरिकांना समजावण्यासाठी एका तीन सदस्यीय टीमचं चं गठन केलं होतं.

या समितीमध्ये वकील संजय हेगडे आणि साधना रामचंद्रन यांच्याशिवाय देशाचे पहिले मुख्य सूचना आयुक्त वजाहत हबीबुल्लाह यांचा समावेश आहे. गुरुवारी या समितीच्या सदस्यांनी आंदोलकांची भेटही घेतली होती. सर्वोच्च नायालयाने आंदोलकांचा आंदोलन करण्याचा हक्क मान्य केला आहे. आंदोलन सुरू राहू द्या, मात्र जागा बदला. इतरांची गैरसोय न करणारे आंदोलन असे प्रतीक बनू या, असे आवाहन संजय हेगडे आणि साधना रामचंद्रन यांनी आंदोलकांना केले आहे.