सॅनिटायझर घोटाळ्यात एका कुटुंबाचा हात, आशिष शेलारांचा गंभीर आरोप

Ashish Shelar

मुंबई : अभिनेता दिनू मोर्या (Dino Morea) यांचे आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) एका नेत्याचे असलेले मधुर संबंध सर्वश्रुत आहेत. मोर्याशी जवळ असलेल्या लोकांनाच आरोग्यविषयक कामांचे ठेके दिले जात आहेत. दुसरीकडे मुंबईच्या महापौर स्वत:च्या मुलाला आणि जावयाला कोव्हीड सेंटर देण्यात गुंग आहेत, या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश अधिवेशनात भाजपच्या (BJP) वतीने केला जाईल, असा इशारा भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला आहे.

राज्यात १४२ कंपन्या सॅनिटायझर बनवण्याचे काम करत होत्या. यात बक्कळ पैसा आहे हे माहिती पडताच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ११० नवीन कंपन्या उदयास आल्या. त्यातील १६ कंपन्यांवर एफडीएने कारवाई करून छापे टाकले होते. त्यातल्या ८ कंपन्या बोगस असल्याचे उघड झाले. एफडीएला आपण पत्र लिहिल्यानंतर सुध्दा एकाही कंपनीची चौकशी केली गेली नाही. सरकारने २५२ कंपन्यांची चौकशी करायला हवी होती अशी खळबळजनक माहिती देताना मुंबई महापालिकेत सॅनिटायझर घोटाळ्यात एका परिवाराचा हात असल्याचा आरोपही शेलार यांनी केला.

एका एनजीओने सगळ्या सॅनिटायजरचे नमुने घेतले. त्यांच्या चाचणीमध्ये ४८ उत्पादने दोषी आढळली. मुंबई महापालिकेने श्वेतपत्रिका काढून ही सगळी माहिती जाहीर करावी. आम्ही या प्रकरणाची पोलिस आणि सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अधिवेशनात करणार आहोत असेही शेलार म्हणाले.

महापालिकेने मुंबईकरांना चांगल्या आरोग्य सेवेपासून वंचित ठेवले. ४५ हजार कोटींच्या ठेवी असलेल्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये अप्रमाणित सॅनिटायझर आणि डिसईन्फेक्टंट वापरली जात आहेत. यामुळेच जानेवारीमध्ये एका ट्रॉमा सेंटरमध्ये रूग्णांची दृष्टी गेली. डॉक्टरांनीच चौकशी समितीसमोर तथ्य सांगितले. रुग्णालयामध्ये निर्माण होणाऱ्या संसर्गाला सर्वस्वी महापालिकाच जबाबदार आहे. महापालिकेचा हलगर्जीपणा मुंबईकरांच्या नशिबी आला, असा आरोप शेलार यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER