एकच चर्चा :  धनंजय मुंडे देणार का?

Dhananjay Munde

मुंबई :- दुसऱ्या पत्नीच्या बहिणीने बलात्काराचा आरोप केलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार की नाही याविषयी आज राजकीय वर्तुळात दिवसभर जबरदस्त चर्चा होती. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत चालला आहे. मुंडे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली.

मुंडे आज सकाळी मंत्रालयात पोहोचले आणि त्यांनी अजित पवार यांचे कार्यालय गाठले. त्यांच्याशी अर्ध्या तास बंदद्वार चर्चा केली. त्यानंतर दुपारी ते सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांना भेटले. तेथे त्यांनी त्यांची बाजू मांडली. माझ्या राजीनाम्याबाबत आपणच निर्णय घ्यावा, जो निर्णय आपण घ्याल तो मला मान्य असेल असे त्यांनी पवार यांना सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. धनंजय मुंडे यांचे मंत्रीपदाबाबतचे भवितव्य शरद पवारांच्या आदेशावर अवलंबून असेल असे मानले जाते. दुसरीकडे मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने दबाव वाढला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे येथे पत्रकारांशी बोलताना मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नैतिकता कायदा आणि लोकशाही संकेत यांचा विचार करून मुंडे यांनी  राजीनामा द्यावा.

ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते शरद पवार यांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगावे,अशी मागणी पाटील यांनी केली.मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तर भाजप राज्यात तीव्र आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांच्या वरील आरोपांची पोलिसांनी सतरा चौकशी करावी आणि सत्य समोर आणावे, हे सत्य समोर आल्यानंतर आवश्यक त्या सर्व मागण्या आम्ही करू असे नाशिक येथे पत्रकारांना सांगितले. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्र वाघ आणि भाजपा प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष उमा खापरे यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तथापि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळली. ते म्हणाले की राजकीय जीवनामध्ये मोठे होण्यासाठी खूप संघर्ष एका व्यक्तीला करावा लागतो. अशावेळी  एखादा आरोप होत असेल तर त्याची चौकशी करण्याआधीच निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही या शब्दात त्यांनी मुंडे यांचा बचाव केला.

निवडणूक आयोगाकडे तक्रार

सध्या शिवसेनेचे नेत्यांवर एकामागून एक आरोप करत असलेले भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले.  निवडणूक आयोगाला त्यांनी एक पत्र पाठवून धनंजय मुंडे यांनी त्यांची दुसरी पत्नी,  त्यांना असलेली अपत्त्ये  याबाबतची सर्व माहिती निवडणूक शपथपत्रात लपवली, याची चौकशी करण्याची मागणी केली`.

ही बातमी पण वाचा : अखेर धनंजय मुंडेंनी घेतली पवारांची भेट, मोठी घडामोड घडण्याची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER