शिवाजी विद्यापीठाच्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी एक कोटी : उदय सामंत

Uday Samant

कोल्हापूर :- शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंजूर करण्यात आलेल्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी एक कोटी रूपयांचा निधी लवकरच वितरित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागाच्या सभागृहात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील प्राध्यापकांची 2900 रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही सुद्धा शासन स्तरावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत म्हणाले, सन 2010 पासून राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये स्थापन झालेल्या अध्यासनांचा आढावा घेऊन ती सुरळीत चालण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी एक कोटी रूपये देण्यात येतील. त्या निधीचा विनियोग विद्यार्थीहित लक्षात घेऊन कशा प्रकारे करणार, त्याचे नियोजन करून प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली.

शासन आणि विद्यापीठे वेगळी नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगून सामंत म्हणाले, शासन आपल्या स्तरावरून विद्यापीठांची काळजी वाहात असताना विद्यापीठांनीही आपले उत्तरदायित्व योग्य प्रकारे सांभाळणे आवश्यक आहे. यापुढील कालखंडात उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांसमवेत प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन विद्यापीठे व संस्थाचालक यांच्या विविध प्रस्तावांवर समोरासमोर चर्चा करून ते मार्गी लावण्याचे धोरण अवलंबण्यात येईल, जेणे करून त्यांचा मंत्रालयात खेटे घालण्याचा त्रास कमी होईल. त्याचप्रमाणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात येईल.

कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी इस्त्रो आणि आय.आय.टी. (मुंबई) यांच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठाचा स्वत:चा खाजगी सॅटेलाईट विकसित करण्याचा मानस असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महोदयांना सांगितले. त्यावर, हा चांगला उपक्रम असून त्यासंदर्भात आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ.धनराज माने उपस्थित होते.