ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री, तर अनेक सुपर मुख्यमंत्री; फडणवीसांची बोचरी टीका

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यातील लॉकडाऊन (Lockdown) हटवण्यासंदर्भात गुरूवारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. गुरुवारी संपन्न झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत अनलॉकच्या ५ टप्पे ठरवण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार राज्यात उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून १८ जिल्ह्यात पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार असल्याची घोषणाही वडेट्टीवार यांनी केली. मात्र घोषणेच्या काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयाकडून असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. नवी नियमावली अद्याप विचाराधीन आहे. राज्यात लॉकडाऊन सुरुच असेल, असं स्पष्टीकरण देण्यात आलं. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) बोचऱ्या शब्दात टीका केली.

कालच्या घडामोडीनंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याचे पुन्हा दिसून आले. मंत्री अनलॉकची घोषणा करुन जनतेच्या आशा पल्लवित करतात. तर काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयाकडून तसा निर्णय झालाच नसल्याचे सांगण्यात येते. ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री असून, अनेक सुपर मुख्यमंत्री असल्याचे म्हणत फडणवीस यांनी शेलक्या शब्दात ठाकरे सरकारची खिल्ली उडवली. ठाकरे सरकारमधील मंत्री आधी घोषणा करतात. मग मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याचे सांगतात. घुमजाव केल्याने मला अनेकांचे फोन आले. लॉकडाऊन आहे की नाही आम्हाला विचारण्यात आलं. मात्र, आम्हाला या निर्णयाची माहिती नसल्याने आम्हाला त्यांना काही सांगता येत नव्हतं. पण मुख्यमंत्र्यांची प्रेसनोट अधिकृत असते. त्यावर विश्वास ठेवा, असं मी सांगितलं. पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊननंतर काल लोकांची उत्सुकता वाढली होती. उत्कंठाही वाढली होती. संभ्रमही निर्माण झाला आणि निराशाही झाली. कालच्या घोषणेमुळे अनेक छोटे दुकानदार सुखावले होते, पण नंतर त्यांचा भ्रमनिरास झाला, असंही ते म्हणाले.

पाच पाच मंत्री मुख्यमंत्री बोलण्याआधीच घोषणा करुन जातात. त्यामुळे या मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा वचक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. आता मुख्यमंत्र्यांनी बेताल झालेल्या मंत्र्यांवर वचक ठेवण्याची गरज आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सल्लाही दिला. तसेच सरकारने काही निर्बंध घातले आहेत. त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र दुकानदारांना ही वेळ मान्य नाही. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असं दुकानदारांचं म्हणणं आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्यावरही भाष्य केले. मुळात महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते. आरक्षण टिकावे यासाठी या सरकारने मागील १५ महिन्यांपासून कुठल्याही हालचाली केल्या नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबतही हेच धोरण स्वीकारले. काल मागासवर्गीय आयोग स्थापन केल्याची माहिती मला मिळाली. हे सरकारचे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असे म्हणत त्यांनी आयोगावरही टोला लगावला.

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडी सरकारमुळेच ओबीसी आरक्षण गेले : फडणवीस यांची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button