धुळयातील रफियोद्दीन शेख खून प्रकरणातील एका आरोपीला अटक

धुळे: शहरातील कराचीवाला खुंट चौकात मंगळवारी (ता . १८) रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रफियोद्दीन शफियोद्दीन शेख ऊर्फ गुड्याची १० जणांनी हत्या केली. खून प्रकरणातील फरार 10 आरोपीपैकी सागर साहेबराव पवार ऊर्फ कट्टी या आरोपीला पोलिसांनी शनिवारी पुणे जिल्ह्यातील कामशेत येथून अटक केली आहे. हत्येचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. फुटेजवरुन आरोपींची ओळख पटली असून, हा खून गोयर परिवारातील सदस्यांनी केल्याचा निष्पन्न झाल्याने रवींद्र उर्फ राजा भद्रा देवरे, विक्रम उर्फ विक्की गोयरसह आठ ते दहा जणांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोडवरील कराचीवाला खुंट चौकातील महापालिकेकडे जाणा-या पारोळा रोडवरील चहाच्या दुकानाजवळ पहाटे साडे सहा वाजेच्या सुमारास कुख्यात गुंड रफियोद्दीन शफियोद्दीन शेख ऊर्फ गुड्या हा काळ्या रंगाच्या स्कुटरवर आला. याठिकाणी आधीच त्याची वाट बसलेल्या 8 ते 10 जणाना तो भेटला. याठिकाणी टोळीतील काही लोकांशी गुड्डयाचा वाद झाला. यावेळी टोळीतील एकाने अचानक त्याच्यावर पिस्तुल रोखली आणि गोळी झाडली. गोळी लागल्याने गुडय़ा जखमी झाला. दरम्यान, टोळीतील अन्य लोकांनी त्याच्यावर तलवार व चॉपरने सपासप वार केले. गंभीररित्या जखमी झाल्याने गुड्डया जमिनीवर कोसळला. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतर हल्लेखोर आग्रारोडर्पयत पायी गेले. त्याठिकाणी उभ्या केलेल्या एका गाडीत बसून ते पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

याप्रकरणी शेख फारुक फत्तू फौजी (46) रा़ जामा मशिद, धुळे यांनी मंगळवारी धुळे शहर पोलिसात दुपारी फिर्याद दिली. त्यानुसार रवींद्र उर्फ राजा भद्रा देवरे, विक्रम उर्फ विक्की गोयर, विलास उर्फ छोटा पापा श्याम गोयर, भीमा रमेश देवरे, दादू रमेश देवरे, श्याम गोयर आणि अन्य तीन ते चार जण यांच्यावर संशय व्यक्त केला आह़े त्यांच्याविरुध्द भादंवि कलम 302, 504, 506, 120 ब आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.