वारिस पठाण यांच्या वक्तव्यावरून भाजप आणि मनसे आक्रमक

मुंबई :- एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी सीएए आणि एनआरसीविरोधात आयोजित सभेत केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र या विधानावरुन भाजपा, मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

वुहानवरुन आलेले महाराष्ट्रातील ५ जण राज्यात परतले

वारीस पठाण यांचे बापजादे आले तरी भारी पडण्याचे स्वप्न पाहू नये, त्यांना स्वातंत्र्याचा इतिहास माहिती नाही, त्याचसोबत आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत, इथल्या देशातला नागरिक स्वस्थ बसणार नाही, खपवून घेणार नाही असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता आणि भाजप नेते प्रविण दरेकर त्यांनी वारिस पठाण यांना दिला आहे. वारिस पठाण यांचे भाषण देशविघातक आहे, त्यांनी आव्हान देण्याचे काम करु नये, आंदोलनाच्या माध्यमातून ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.

सीएए आणि एनआरसीविरोधात आयोजित केलेल्या सभेत आम्ही १५ कोटी असलो तरी १०० कोटींना भारी आहोत, आतापर्यंत महिला बाहेर आल्यात तर तुम्हाला घाम फुटला आहे आम्ही आलो तर काय होईल समजून घ्या असा वारिस पठाण यांनी इशारा दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून काही लोकांना कंठ फुटायला लागले आहेत, कर्नाटकात भाजपाचे सरकार आहे त्यांनी तिथल्या तिथे कठोर कारवाई वारिस पठाण यांच्यावर करायला हवी अशी मागणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. यापूर्वीही एमआयएमचे नेते अकबरउद्दीन औवेसी यांनी हैद्राबादमध्ये १५ मिनिटे पोलीस हटवा, मग बघा असे भाषण केले होते. त्यावेळी त्यांना जेलमध्ये जावे लागले होते.