विश्वास ठेवा ! आजच्याच दिवशी भारतातच सुरू झाले होते वन डे क्रिकेट

क्रिकेटची सुरुवात पाच-पाच दिवसांचे कसोटी सामने आणि तीन किंवा चार दिवसांच्या प्रथम श्रेणी सामन्यांनी झाली असली आणि या प्रकारच्या क्रिकेटची मजाच वेगळी असली तरी क्रिकेटची लोकप्रियता वाढली ती मर्यादित षटकांचे क्रिकेट (Limited Overs Cricket) आल्यापासूनच. वन डे सामने (OD) आणि विश्वचषक स्पर्धांनीच (World cup) क्रिकेटला तुफान लोकप्रिय बनवले आहे. आतापर्यंत वन डे क्रिकेटची सुरुवात इंग्लंडमध्ये १९६२ साली काउंटी संघादरम्यानच्या मिडलँडस कप (Midlands Cup) नावाच्या स्पर्धेने झाल्याचे मानण्यात येते; पण वस्तुतः मर्यादित षटकांच्या क्रिकेटची सुरुवात भारतातून झाल्याची माहिती समोर आली आहे.

आणि तो दिवस आजचाच होता २३ जानेवारी. १९४४ साली याच दिवशी मर्यादित षटकांचा पहिला सामना खेळला गेला होता. १९४४ मध्ये त्या वेळच्या मद्रास येथे खेळली गेलेली बी. सुब्रमण्यम स्मृती (B. Subramaniam Memorial) क्रिकेट स्पर्धा ही मर्यादित षटकांची खेळली गेलेली बहुधा पहिलीच स्पर्धा आहे. मद्रास क्रिकेट संघटनेने (एमसीए) आयोजित केलेल्या या स्पर्धेत २३ जानेवारी १९४४ रोजी प्रत्येकी ५५ षटकांचे सामने खेळले गेले होते, अशी माहिती उपलब्ध आहे. या दिवशी दोन सामने खेळले गेले. त्यात टी.सी.सी.ने अँग्लो इंडियन स्पोर्टस् क्लबच्या संघावर ९ गड्यांनी विजय मिळवला तर एम अँड एस. एम. रेल्वे संघाने मायलापोर रिक्रिएशन क्लब ‘ब’ संघाला १५ धावांनी मात दिली होती.

या आशयाचे वृत्त २४ जानेवारी १९४४ रोजी ‘इंडियन एक्सप्रेस’ या दैनिकाने प्रसिद्ध केलेले होते. एमसीएतर्फे आयोजित केली गेलेली ही पहिली नाॕकआऊट स्पर्धा होती. लीग स्पर्धेऐवजी हे सामने खेळले गेले होते. कमाल ५५ षटकांचे हे सामने होते. टीसीसी व अँग्लो इंडियन संघाच्या सामन्यात अँग्लो इंडियन संघ २९ षटकांत ६८ धावांमध्ये बाद झाला होता. तर टीसीसीने २० षटकांत ११७ धावा केल्या होत्या. यानंतर १९५१ मध्ये केरळातील कोची येथे खेळली गेलेली अ.भा. पूजा क्रिकेट स्पर्धासुद्धा मर्यादित षटकांच्या सामन्यांची स्पर्धा होती.

केरळ क्रिकेट संघटनेचे पहिले सचिव के. व्ही. केलाप्पन थाम्पुरन यांची ही कल्पना होती. या स्पर्धेचा पहिला सामना प्रत्येकी ५० षटकांचा खेळला गेला. हीच कल्पना पुढे इंग्लंडमधील काउंटी संघांनी उचलली आणि वन डे सामने नियमित सुरू झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER