लॉकडाऊनमुळे सिंगल स्क्रीन बंद होण्याच्या मार्गावर

एंट्रो- चित्रपटगृहांचा व्यवसाय हा रोज येणा-या प्रेक्षकांवर अवलंबून असतो. मात्र कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊमुळे चित्रपटगृहे ओस पडलेली आहेत. देशात जुलैपासून चित्रपटगृहे सुरु करण्याचा विचार चित्रपटगृह मालकांची संघटना करीत आहे. यासाठी त्यांनी सरकारसोबत बोलणीही सुरु केली आहेत. दुसरीकडे सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांना मात्र पुन्हा एकदा आपल्या अस्तित्वासाठी लढाई करावी लागणार आहे.

Chandrakant Shindeहिंदी चित्रपटांना शेवटच्या वर्गातील प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात सिंगल स्क्रीनचा मोठा वाटा आहे. सर्वांत पुढील आसनांचे तिकीट दर अत्यंत कमी तर ड्रेस सर्कल, बाल्कनी यांचे तिकीट दर जास्त. त्यामुळे एकाच चित्रपटगृहात गरीब माणूस पुढे आणि थोडे श्रीमंत मागे बसून चित्रपटाचा आस्वाद घेत असत. अनेक चित्रपटांनी सिंगल स्क्रीनमध्ये वर्षानुवर्षे राज्य केलेले आहे. यात ‘जय संतोषी मां’पासून ‘शोले’,’आराधना’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’पर्यंत अनेक चित्रपटांचा समावेश आहे. राजेंद्रकुमारच्या अनेक चित्रपटांनी सिल्व्हर ज्युबिली साजरी केल्याने त्याला तर ज्युबलीकुमारच म्हटले जायचे.

जसा काळ सरकतो तसे आधुनिक तंत्रज्ञान येते, पैसा येतो आणि खर्च करणा-याची ऐपतही वाढते. त्यामुळेच परदेशाप्रमाणे आपल्याकडे मल्टीप्लेक्सचे जाळे पसरण्यास सुरुवात झाली. मात्र तेव्हाही मल्टीप्लेक्समध्ये श्रीमंत प्रेक्षक जाईल तर गरीब सिंगल स्क्रीनकडेच येईल याची खात्री सिंगल स्क्रिन चित्रपटगृह मालकांना होती. ज्यांनी डीव्हीडीच्या युगाला समर्थपणे तोंड दिले ते या मल्टीप्लेक्सलाही तोंड देऊन टिकून राहतील असे वाटत होते. परंतु तसे झाले नाही. मल्टीप्लेक्समधील आलिशान सुविधा पाहून प्रेक्षक तिकडे वळला आणि सिंगल स्क्रीनचा -हास होण्यास सुरुवात झाली. देशात सध्या नऊ हजारच्या आसपास चित्रपटगृहे असून यात अडीच हजार मल्टीप्लेक्स पडद्यांचा समावेश आहे. ६३२७ सिंगल स्क्रीन आहेत.

मल्टीप्लेक्सला तोंड देत असतानाच आता सिंगल  स्क्रीन चित्रपटगृहांच्या मालकांसमोर कोरोनाने नवे संकट उभे केले आहे. एकीकडे मल्टीप्लेस चित्रपटगृहांशी स्पर्धा करीत असतानाच, वाढती महागाई, सिंगल स्क्रीनचा रोज वाढत जाणारा खर्च आणि त्या मानाने उत्पन्नात झालेली मोठ्या प्रमाणावरील घट यामुळे अगोदरच सिंगल स्क्रीन मालकांपुढे व्यवसाय कसा करावा, असा प्रश्न उभा ठाकला असताना त्यात आता लॉकडाऊनने भर पाडली आणि त्यांचे कंबरडे पूर्णतः मोडून टाकले आहे. त्यामुळे अगोदरच प्रेक्षक संख्या कमी असल्याने सिंगल स्क्रीनपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सिंगल स्क्रीनमध्ये फक्त शुक्रवार ते रविवार किंवा सुटीच्या दिवशी प्रेक्षकांची ब-यापैकी गर्दी असते आणि इतर दिवशी २५ प्रेक्षकही येण्याची मारामारी असल्याने सिंगल स्क्रीन आर्थिक तोट्यात होते. तसेच सिंगल स्क्रीनसाठी प्रत्येक राज्यात वेगळे नियम, दरवर्षी नूतनीकरणासाठी करावा लागणारा अर्ज, त्यासाठी ५० ते ६० विविध विभागांचे परवाने त्यातच लागणारा २८ टक्के जीएसटी, त्यामुळे दरवर्षी ३ ते ४ टक्के सिंगल स्क्रीन बंद होतात.

जुलैपासून चित्रपटगृहे सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मल्टीप्लेक्स मालकांनी सोशल डिस्टन्सिंगसाठी आसन व्यवस्थेत बदल, तिकीट दरात कपातीसह अन्य काही सुविधा देण्यास तयारी दर्शवत चित्रपटगृह सुरू करण्याची मागणी केली आहे. सिंगल स्क्रीनमध्ये येणारा प्रेक्षक हा मध्यम वर्गातील असल्याने लॉकडाऊननंतर तो लगेचच चित्रपट पाहायला येईल याची काहीही शक्यता नाही. चित्रपट पाहणे हे आता यादीत सगळ्यात शेवटच्या स्थानी असणार आहे. त्यामुळे सिंगल स्क्रीन जुलैपासून जरी सुरू झाले तरी कोरोनाची भीती कायम असल्याने आणि मनोरंजन शेवटच्या स्थानावर असल्याने आणखी काही महिने तरी प्रेक्षक चित्रपट पाहायला येतील असे वाटत नाही. तसेच प्रेक्षकांना आता टीव्हीवर चित्रपट पाहण्याची संधी देणा-या ओटीटी प्लॅटफॉर्मची संख्या वाढत असून नवनवीन ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केले जात आहेत.

मुंबईत ६५ तर राज्यात ४६५ सिंगल स्क्रीन आहेत. कधीकाळी ही संख्या दोन हजारांच्या आसपास होती. रियल इस्टेटचे वाढते भाव आणि प्रेक्षकांचा मल्टीप्लेक्सकडे  वाढता ओढा पाहून येत्या सहा महिन्यांत  अनेक सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER