‘मे डे’च्या सेटवर अमिताभला आठवले ‘दीवार’चे दिवस

Amitabh Bachchan - May Day - Deewar

अमिताभच्या (Amitabh Bachchan) करिअरमधील दीवार सिनेमा हा एक मैलाचा दगड मानला जातो. प्रकाश मेहरा द्वारा निर्मित आणि दिग्दर्शित या सिनेमाची कथा सलीम जावेद यांची होती. त्यांचीच पटकथा आणि कचकचीत संवाद, अमिताभचा अँग्री यंग मॅन, शशीकपूरचा भावाला वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा इंस्पेक्टर आणि मेरे पास मां है हा त्याचा अजरामर संवाद ही काही या ‘दीवार’ची वैशिष्ट्ये. अमिताभच्या पहिल्या पाच सिनेमांचा विचार केला तर त्यात दीवारचा समावेश अवश्य करावा लागेल. भारतात कदाचित असे एकही ठिकाण नसेल जेथे अमिताभने शूटिंग केले नसेल.

आज दीवारची (Deewar) आठवण येण्याचे कारण म्हणजे अमिताभने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकलेले फोटो आणि त्याला दिलेली कॅप्शन. अमिताभ गेल्या 6 दशकांपासून बॉलिवूडमध्ये काम करीत आहे. या काळात त्याने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आणि आज या वयातही तो सिनेमात ताज्या दमाच्या नायकांसोबत महत्वाच्या भूमिका साकारताना दिसतो. अजय देवगणने अमिताभसोबत तीन-चार सिनेमे केले असून आता तो प्रथमच अमिताभला ‘मे डे’ या त्याची निर्मिती असलेल्या सिनेमासाठी दिग्दर्शित करीत आहे. या सिनेमाचे शूटिंग सध्या दक्षिण मुंबईत सुरु आहे. या सिनेमात अमिताभ वकिलाची भूमिका साकारीत आहे असे समजते. अमिताभने सोमवारी या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि त्याच्या 1975 मध्ये रिलीज झालेल्या दीवार सिनेमाची आठवण काढली. केवळ आठवणच नव्हे तर त्याने दीवार सिनेमातील एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अमिताभ बच्चनने इंस्टाग्राम अकाउंट वर फोटोंचा कोलाज शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले आहे, ‘गेलेला काळ पाहाताना. याच दगडांच्या इमारतीत दीवार सिनेमातील पोलीस इन्स्पेक्टर शशी कपूर त्याचा भाऊ विजयला गोळी मारतो. आज इतक्या वर्षानंकर मे डे ची शूटिंग त्याच लोकेशनवर होत आहे. दीवार 1975 मध्ये बनला होता आणि आज 2021 मध्ये मे डे. अमिताभने शेअर केलेल्या आणखी एका फोटोंच्या कोलाजमध्ये एक फोटो दीवार सिनेमातील असून दुसरा मे डे च्या शूटिंगचा आहे. यासोबत अमिताभने लिहिले आहे, ‘दीवार 1975… मे डे 2021… गेलेला काळ पाहाताना, तोर कॉरिडॉर… तेच लोकेशन. या ठिकाणी माझ्या अनेक सिनेमांचे शूटिंग झाले आहे.

अमिताभच्या या आठवणीमुळे त्याच्या फॅन्सच्या डोळ्यापुढेही दीवारच्या आठवणी नक्कीच ताज्या झाल्या असतील यात शंका नाही. हे वाचून आमच्या वाचकांच्या डोळ्यासमोर दीवारमधील अमिताभ नक्कीच उभा राहील हे नक्की.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER