दोन मुलांच्या आईने कुमारी सांगून केले तरुणाशी लग्न

  विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी लाखो रुपयांचा गंडा घालून केला पोबारा

fraud

कुमारी असल्याचे सांगून दोन मुलांच्या आईने जळगावच्या तरुणासोबत लग्न केले. त्याच्याकडून एक लाख रुपये रोकड आणि १५ हजारांचे दागिने उकळले. यात पतीने फसवणूक झाल्याची फिर्यादी १२ फेब्रुवारी रोजी क्रांती चौक पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी अमोल रमेश देठेसह दोन महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

श्रीराम वीरभान पाटील (रा. जळगाव) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची लग्न करण्याची इच्छा असल्यामुळे ते मुलीच्या शोधात होते. दरम्यान, त्यांची औरंगाबादेतील अमोल रमेश देठे याच्याशी ओळख झाली. त्याला लग्नाबाबत सांगितले असता त्याने एका मुलीचे स्थळ असल्याचे पाटील यांना सांगितले. त्यानुसार, पाटील हे औरंगाबादेत आले. तेव्हा देठे आणि एका महिलेने सविता (नाव बदललेले आहे) हिची पाटीलसोबत ओळख करून दिली. पाटीलला सविता पसंद पडल्यानंतर त्यांचे लग्न ठरले. तेव्हा अनिताने कुमारी असल्याचे पाटील यांना सांगितले होते. परंतु, सविताची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्याचे सांगून देठे आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेने पाटीलकडून एक लाख रुपये रोकड आणि अंदाजे १५ हजार रुपयांचे दागिने करून घेतले. तेच दागिने सविताला लग्नात घातले होते.

अन केला पोबारा

श्रीराम पाटील आणि सविता यांचा विवाह झाल्यानंतर अनिताचे सासरी जोरदार स्वागत करण्यात आले. दुसऱ्या दिवशी ती सासरच्या मंडळीसोबत देवदर्शनासाठी जाणार तोच तिला औरंगाबादेतून फोन गेला. आईची प्रकृती बिघडल्याचे खोटे सांगून तिला तत्काळ औरंगाबादला बोलावले. जळगावहून मध्यवर्ती बसस्थानकावर येताच वॉशरूमला जाऊन येते, असे सांगून सविता गायब झाली. अर्धा तास न आल्याने श्रीराम पाटील यांनी क्रांती चौक पोलिसांत बेपत्ताची नोंद केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला. तेव्हा ती स्वत:हून गायब झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, सविता दोन मुलांची आई असल्याचे समोर आल्यावर पाटील यांना धक्का बसला. तसेच, देठे आणि एजंट महिलेने कट रचून आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी त्यांनी क्रांती चौक पोलिस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती चौक पोलिसांनी महिलेला अटक करून तिच्याकडून ५० हजार रुपये जप्त केले आहेत.