डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या याचिकेवर सोनिया,राहुल गांधींसह इतरांना नोटीस

‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात अतिरिक्त पुराव्याचा मुद्दा

नवी दिल्ली: ‘नॅशनल हेराल्ड’ (National Herald) खटल्यात आरोपींविरुद्ध दंडाधिकाºयांपुढे अतिरिक्त पुरावे सादर करण्याची परवानगी मिळावी यासाठी भाजपा नेते व खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी (Subrahmanyam Swamy)
यांनी केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) व त्यांचे चिरंजीव आणि केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस जारी केली आहे.

डॉ. स्वामी यांनी दाखल  केलेल्या खासगी फौजदारी फिर्यादीवर येथील रोझ अ‍ॅव्हेन्यू संकुलातील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हा ‘नॅशनल हेराल्ड’ खटला सध्या आरोप निश्चितीआधीचे साक्षीपुरावे नोंदविण्याच्या टप्प्यावर आहे. त्यात काही आणखी कागदपत्रे सादर करू देण्यासाठी डॉ. स्वामी यांनी केलेला अर्ज दंडाधिकाºयांनी अमान्य केला होता. त्याविरुद्ध डॉ. स्वामी उच्च न्यायालयात आले आहेत. न्या. सुरेश कुमार कैत यांनी डॉ. स्वामी यांच्या मूळ फिर्यादीत आरोपी असलेल्या सोनिया गांधी, राहुल गांधी, आॅस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोडा व ‘यंग इंडियन’ (नॅशनल हेराल्डची प्रकाशक कंपनी) या सर्वांना नोटीस काढून पुढील सुनावणी १४ एप्रिल रोजी ठेवली. तोपर्यंत दंडाधिकाºयांपुढे सुरु असलेल्या कामकाजास स्थगितीही देण्यात आली.

‘आरटीआय’चा अर्ज करून मिळविलेली माहिती, सोनिया गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात सन २०१६ मध्ये केलेली एक ‘एसएलपी’, ‘यंग इंडियन’ कंपनीच्या  प्राप्तिकर निर्धारणाचा (Income Tax Assesment Order) २०१७ मधील आदेश अशी काही नवी कागदपत्रे दाखल करण्याची परवानगी डॉ. स्वामी यांनी मागितली होती. परंतु फिर्यादी या नात्याने डॉ. स्वामी यांनी आधी सूचित केलेले सर्व साक्षीपुरावे नोंदवून झाल्यानंतरच ही नवी कागदपत्रे देता येतील, असे म्हणून दंडाधिकाºयांनी त्यासाठी परवानगी नाकारली होती.

दंड प्रक्रिया संहितेतील कलम २४४ चा हवाला देऊन डॉ. स्वामी यांचे असे म्हणणे आहे की, यानुसार दंडाधिकाºयांना खूप व्यापक अधिकार आहेत व ते खटल्याच्या कुठल्याही टप्प्याला नवे साक्षीदार बोलावून त्यांची साक्ष घेण्याची व नवे कागदोपत्री पुरावे सादर करण्याची परवानगी फिर्यादीस देऊ शकतात.

आधी ‘नॅशनल हेराल्ड’ हे वृत्तपत्र ‘असोशिएटेट जर्नल्स लि.’ या कंपनीच्या मालकीचे होते. त्या कंपनीस काँग्रेस पक्षाने ९० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. ते कर्ज नंतर गांधी कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ‘यंग इंडियन’ या कंपनीस हस्तांतरित करून त्याबदल्यात या कंपनीस  मूळ कंपनीचे ५० लाख रुपयांचे शेअर देण्यात आले. या व्यवहारात गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान, फसवणूक, विश्वासघात व मालमत्तेचा अपहार करण्यात आल्याचा आरोप करून डॉ. स्वामी यांनी हा खटला दाखल केला आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER