जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाच्या निमित्ताने…

World Suicide prevention day

कालचा १३ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ म्हणून मानला जातो. दुर्दैवाने त्या दिवसाला या वर्षी अत्यंत काळोखी पार्श्वभूमी होती. चंदेरी दुनियेवर पसरलेला हा काळोख निश्चितच अस्वस्थ करणारा आहे .आता केवळ चंदेरी कडा तेवढीच ओळख उरावी याचे वाईट वाटते. पण ‘आत्महत्या’ या शब्दाकडे मोठ्या प्रमाणात यामुळे लक्ष वेधले जाऊ लागले. खरं तर गेल्या वर्षा-दोन वर्षांत आपल्या शेतकरी बांधवांच्याही आत्महत्यांचे वाढते प्रमाण अस्वस्थ होण्याला पुरेसे होते. सध्याच्या या प्रकरणांमुळे या परिस्थितीने अगदी कळस गाठला.

का करत असतील हे लोक आत्महत्या चंदेरी दुनियेत पैसा ,कीर्ती ,प्रतिष्ठान ,रंगरूप, ग्लॅमर सगळं काही असताना? असा पहिल्यांदा प्रश्न पडत होता. खरं तर जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुठल्या न कुठल्या प्रकारे असे निराशेचे क्षण येतच असतात. म्हणूनच आत्महत्या म्हणजे नेमकं काय ? त्याचा सध्याच स्टॅटिस्टिक काय सांगतं? कुठल्या कारणांनी लोक याकडे वळू पाहतात? त्यांची साधारण लक्षणंकाय? काही पूर्वसूचना देतात का हे लोक?

समाजात यासंबंधी काही गैरसमज आहेत का? म्हणून या विषयाकडे बघण्याचे ठरवले. आत्महत्येसंबंधी विचार करताना आपण म्हणू शकू की , काही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या, न जाणवणाऱ्या सर्व कारणांमुळे, स्वेच्छेने आणि हेतुपूर्वक एखाद्याने केलेला स्वतःच्या आयुष्याचा शेवट! संख्यात्मक दृष्टी २००९ ते २०१७ चा आढावा घेतला तर आत्महत्येच्या संख्येत ६० टक्क्यांनी वाढ झाली आणि ही वाढ विशेषतः १५ ते ३० या वयोगटातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात झाली . एकूणच भारतातील मृत्यूची जी कारणं आहेत, त्यापैकी आत्महत्या हे कारण तिसऱ्या पायरीवर आहे.

स्टॅटिस्टिक असं सांगतं की ,जागतिक स्तरावर एका वर्षात आठ लाख लोक आत्महत्या करतात. जगभरामध्ये प्रत्येक चार सेकंदाला एक आत्महत्या घडते, तर भारतात हे प्रमाण चार मिनिटाला एक असे आहे. ज्यांना आपण आपलं भविष्य म्हणून बघतो ती मुलं ! प्रत्येक दिवशी २८ विद्यार्थी मृत्यूला जवळ करतात. मुलांच्या ताणाकडे आपण कधीच लक्ष देत नाही. किंबहुना त्यांना ताण असू शकतो हेच मान्य नसते. मुख्य म्हणजे स्त्रियांमध्ये तीव्र निराशेचे प्रमाण खूप जास्त आहे; पण स्त्री-पुरुष गुणोत्तर बघितल्यास पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा आत्महत्येचे प्रमाण दुप्पट आहे .

याला कारण असेही असू शकते की, ‘मर्द’ त्याला रडणे , दुःख करणे याची परवानगी नाही. अशी आपल्या समाजाची असणारी मनोरचना! त्यामुळे प्रचंड त्रास होऊनही तो कधी एक्सप्रेस करत नाही. आणि मग टोकाचा निर्णय घेतो हे एक कारण ! स्त्रियांची विजिगीषु वृत्ती, धीर, चिवटपणा हेही कारण आहेच. यानिमित्ताने साधारण कुठल्या कारणाने लोक आत्महत्येकडे वळतात ? तर तीव्र स्वरूपाची निराशा! किंवा मूड डिसॉर्डर! ज्यात मेजर डिप्रेशन, बायपोलर डिसॉर्डर आणि मॅनिया या तीन आजारांचा समावेश होतो. यापैकी तीव्र नैराश्य आणि बायपोलरमधील डिप्रेशन एपिसोड ही विशेषता जबाबदार असतात. परंतु सगळे निराशाग्रस्त आत्महत्या करतात असे नाही आणि आत्महत्या करणारे सगळेच निराश असतात असेही नाही.

परंतु पुन्हा पुन्हा येणारी नैराश्याची अवस्था व्यक्तीच्या आत्महत्येच्या प्रयत्‍नांची शक्यता वाढवते. याव्यतिरिक्त घटस्फोट ,आर्थिक संकट, कुटुंबातील प्रिय व्यक्तीचा मृत्यू , ध्येयशून्यता, सासरच्या लोकांकडून होणारा छळ किंवा वारंवार होणारी वस्तूची मागणी, माहेरील लोकांचे दारिद्र्य , जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध, निराधारपणाची भावना ,व्यसनी पती, अपमान किंवा कुठल्या तरी आजाराने कंटाळून व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकते. त्याचप्रमाणे ज्यांची मानसिक आजारांची हिस्टरी आहे किंवा ज्यांनी याअगोदर आत्महत्येचे प्रयत्न केलेले आहेत अशा व्यक्ती. तणावाला सतत दोन तोंडं देणाऱ्या व्यक्ती, अतिशय संवेदनशील व्यक्ती, यांचं वागणं हे भावनेला चटकन प्रतिसाद देणारं असतं (इम्पल्सिव). परीक्षेत अपयश किंवा अपेक्षेपेक्षा कमी मार्क येणे, ब्रेकअप होणे, मोठ्या जबाबदारीचे ओझे सांभाळणे अशक्य वाटल्याने ,अशी अनेक कारणे यामागे असू शकतात. खरं तर आत्महत्या ही बाब ‘उठले आणि केली’ असं होत नाही.

आत्महत्येचे विचार त्या व्यक्तीच्या मनात किती तरी दिवस चाललेले असतात. आत्महत्येचा प्रयत्न करणे आणि प्रत्यक्ष आत्महत्या करून स्वतःचे आयुष्य संपवून टाकणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आत्महत्येच्या वर्तनासंदर्भात फारबेरी आणि लीटमन हे म्हणतात, “आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या मनात आपण मरावे ही मूळ स्वरूपातील इच्छा नसते. पण आपल्याला होणारा त्रास , छळ इतरांच्या लक्षात आणून द्यावा, असे त्यांना वाटते. त्यामुळे अशा व्यक्ती स्वतःला थोडीशीच इजा करून घेणे, थोडेसे विष प्राशन करणे , अशा मार्गाचा अवलंब करतात. असे वागल्यामुळे इतर लोक आत्महत्या करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला जवळ करतात. तिच्या समस्यांमध्ये लक्ष घालतात.

तिला संरक्षणात्मक वागवितात. ज्या व्यक्तींना आत्महत्या करून जीवन संपवायचे असते त्या अगदी गुपचूप कोणाला कल्पनाही येणार नाही अशा प्रकारे आत्महत्या करतात.” आत्महत्येसंबंधीची काही लक्षणे ही आपल्याला भावनिक बदल, वागणुकीतील बदल आणि विचारांमधील बदल जाणवू शकतात. भावनिकदृष्ट्या अशा व्यक्ती उदास , काहीशा चिडचिड्या एकेकट्या राहू लागतात. कुणाशी बोलत नाहीत. ड्रग्सचा वापर करायला लागतात. जेवत नाहीत, झोप येत नाही अशी लक्षणे दिसतात तर वागणुकीच्या दृष्टीने स्वतःची काळजी न घेणे, स्वच्छता न राखणे आणि विचारांच्या बाबतीत साधारण ‘ट्रँगल ऑफ डिप्रेशन’ नजरेस पडतो. जसे की होपलेसनेस, हेल्पलेसनेस आणि वर्थलेसनेस!

मी कोणाच्या उपयोगाची नाही / उपयोगाचा नाही किंवा हतबलता जाणवणे ,निराधार वाटणे आणि कुठेही जराशी आशा न वाटणे. महत्त्वाचा भाग म्हणजे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींपैकी ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्याबद्दलची पूर्वसूचना देऊन ठेवत असतात. बरेचदा काहीतरी लिहून ठेवणे किंवा आपल्या मुलांना सांगून ठेवणे किंवा मुलीला स्वयंपाक करण्याचे प्रशिक्षण देणे. आपले जगणे निश्चित नसल्याचे वारंवार सांगणे. फोन करून गुडबाय सांगणे , आपले विल बनवणे , जवळच्या वस्तू वाटून टाकणे. इत्यादी. सुसाईडबाबत काही मिथस समाजामध्ये आहेत. जसे की कुणी त्याबाबत पूर्वसूचना देतो आहे असं वाटत असेल आणि आपण त्याला आत्महत्येचा विचार येतो आहे का, अ

सं जर विचारलं तर आपण त्याला आयडिया देतो आहे ही चुकीची समजूत आहे. जर असं कोणी बोलत असेल तर आपण जागरूक राहायला हवं. जो बोलतो तो करत नाही असे वाटणे, खरं म्हणजे असं चॅलेंज समोरच्याला देऊ नये; कारण ‘इट इज क्राय फॉर हेल्प’ हे लक्षात घ्यायला हवं. कारण जो म्हणतो तो करेल काय? असं नाही .पण त्याच्या मनात दोलायमान स्थिती जर असेल, त्या क्षणी जर काही आधार मिळाला तर ते निश्चितच चांगले होईल.आत्महत्येवर उपाय करणे खूप सोपे नसते; कारण वैचारिक वादळात सापडलेली ती व्यक्ती आपण अतिशय टोकाचा विचार करतो आहोत हे समजून घेत नाही .आपली समस्या कोणाला तरी सांगावी अशा मानसिकतेत ती नसते. अशा व्यक्तींना नातेवाइकांद्वारे सर्वप्रथम वैद्यकीय उपचारांसाठी आणावे. नंतर त्या व्यक्तीस समुपदेशकाकडे पाठवून तिचे मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असते.

त्यासाठी मानसशास्त्रात ‘क्रायसिस इंटर्वेंशन’ या प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला जातो. परंतु सर्वसामान्यपणे आपल्या आजूबाजूस अशी व्यक्ती आढळल्यास किंवा कुणी पूर्वसूचना देते आहे असं वाटल्यास — सर्वप्रथम हा अतिशय संवेदनशील विषय आहे हे लक्षात घेऊन नकारात्मक प्रतिक्रिया देऊ नये . योग्य ठिकाणी घेऊन जावे ! लक्षपूर्वक ऐकून घेण्यावर भर द्यावा . उत्तम लिसनर बना. आपलं लक्ष वेधून घेण्याचा त्या व्यक्तीचा प्रयत्न असतो .

त्यामुळे त्याची भावना जाणून घेणं , त्याला भावना व्यक्त करण्यासाठी उद्युक्त करणं, सतत संवाद सुरू राहील अशा प्रकारे बोलतं करणं, एकट्याला न सोडणं, नेहमी त्याच्याबरोबर राहायला पाहिजे, त्याच्या बोलण्यावर आपल्या रिऍक्शन्स अतिशय साधेपणाने जायला हव्यात, ‘कीप इट सिम्पल !’ आणि त्याच्याबरोबर फॅमिली आहे, आपण आहोत हे सतत पोचवणं , तू ही समस्या सहज पार करू शकतो/ शकते. हे सांगून सकारात्मकता जागवणे. थोडक्यात एकमेकांसाठी वेळ काढणे आज खूप गरजेचे आहे . तरच आपल्याला या लक्षणांची आणि पूर्वसूचनेची जाणीव होऊ शकेल आणि सुसाईड प्रिव्हेन्शनला आपला हातभार लागेल, जे आज खूप गरजेचे आहे.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER