World Mental Health Day निमित्ताने

World Helath Day

१० ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी वेगवेगळे विषय जागतिक आरोग्य संघटना या निमित्ताने चर्चेला ठेवते. आपल्या आयुर्वेदशास्त्रातही मानसिक व्याधी, मन म्हणजे काय, मनाचे कार्य, दोष, मानसिक अस्वास्थ्याचे शरीरावर होणारे परिणाम त्याची चिकित्सा अशा संपूर्ण बाजूने मनाचा विचार केला आहे. मन:स्वास्थ्य टिकविण्याकरिता आचारविचार यांचे वर्णन आयुर्वेदात केले आहे. या नियमांचे अवलंबन मानसिक संतोषाकरिता आवश्यक आहे. कोरोनामुळे तर अधिकच मानसिक असंतुलानाच्या घटना आपण आजूबाजूला बघतोय. घरात राहिल्यामुळे, नोकरीतील व्यवसायातील अस्थिरता, पैशांची चणचण तसेच सर्व असूनही चिंता क्रोध इत्यादी मानसिक आवेग वाढलेले दिसताहेत. आयुर्वेदात (Ayurveda) सद्वृत्तपालन हा विषय वर्णित आहे. आपले कर्म योग्य पद्धतीने अवलंबन केल्यास मनुष्याला मानसिक समाधान मिळते.

 • अनेक नियम स्वच्छतेविषयी, भोजनाविषयी, पठणपाठण – अभ्यासाविषयी आहेत.
 • काही नियम बघूया जे मानसिक स्वास्थ्याकरिता सांगितले आहे. धीरता सोडू नये.
 • आपल्याकडे जे काम करतात त्याचे परिश्रमिक वेतन थांबवू नये.
 • आपल्या जवळच्या व्यक्तींवर अविश्वास दाखवू नये.
 • आपण एकटेच सुखी होण्याकरिता प्रयत्न करू नये.
 • दुःखदायी आचारविचार करणारे आपण असू नये.
 • म्हणजेच आपल्या वागण्या-बोलण्याने कुणी दुःखी होऊ नये.
 • सतत शोक – अतिविचार पण करू नये.
 • कार्य करण्याचा वेळ निरर्थक घालवू नये.
 • कार्यकौशल्य प्राप्त करावे.
 • कोणतेही कार्य व्यवस्थित परीक्षा करून म्हणजेच माहिती घेऊनच करावे.
 • चंचल मनाला स्वच्छंदता  करण्यापासून थांबविणे.
 • क्रोध व अति हर्ष असताना कोणतेच कार्य करू नये.
 • कार्य सफल झाल्यावर अत्यंत आनंद तसेच कार्य असफल झाल्यावर अतिशोक करू नये.
 • म्हणजेच दोन्ही अवस्थेत स्थिर राहावे.
 • कोणाद्वारे झालेल्या अपमानाचे वारंवार स्मरण करू नये.
 • मदिरा, जुगार यांची इच्छा ठेवू नये.
 • दुसऱ्यांची निंदा करू नये.
 • अधिक बोलू नये, अभिमानी नसावे.
 • आपल्यावर प्रेम करणारे, आपत्तिकाळात मदत करणारे तसेच गुप्त गोष्टी जाणणाऱ्यांना आपल्यापासून दूर करू नये.
 • सज्जन पुरुष, गुरू  यांची निंदा, अपमान करू नये.
 • शास्त्राचे, संस्थेचे नियम भंग करू नये.
 • दुसऱ्यांच्या गुप्त गोष्टी कुणाला सांगू नये.

असे अनेक नियम सद्वृत्तपालन या विषयांतर्गत केले आहेत. हे वाचून तुमच्या लक्षात आले असेल की, आजच्या काळात जे मानसिक अस्वास्थ्याची जी कारणे आहेत ती हीच  आहेत. याव्यतिरिक्त काही धारणीय वेग म्हणजेच अशा निंदित गोष्टी ज्यावर प्रत्येकाने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. याचेदेखील वर्णन आयुर्वेदात केले आहे. काही मानसिक, कायिक, वाचिक नियम पालन करणे मनाच्या प्रसन्नतेकरिता आवश्यक आहे.

मानसिक वेग उदा. लोभ, शोक, भय, क्रोध, अहंकार, निर्लज्जता, ईर्ष्या, प्रेम, दुसऱ्याचे धन प्राप्त करण्याची इच्छा. वाचिक वेग उदा. अत्यंत कठोर शब्द, चुगलखोरी, खोटे बोलणे. कायिक वेग उदा. दुसऱ्यांना पीडा देणे, परस्त्री समागम, चोरी, हिंसा. या गोष्टींवर आपल्या शरीर व मनाचे नियंत्रण नसेल तर मानसिक रोग अस्वास्थ्य निर्माण होते. अनेक आत्महत्या हत्या, हिंसा, घटना आजकाल न्यूजमध्ये  आपण बघतो वा वाचतो त्याची कारणे आयुर्वेदात सांगितलेल्या धारणीय व सद्वृत्तपालन नियमांचे पालन न करणे हेच आहे. जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त आयुर्वेदाच्या या विशेष मार्गदर्शनाचा अवलंब करूया, सामाजिक व मानसिक स्वास्थ्य टिकवूया !

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER