जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने – आयुर्वेदाची आरोग्याची परिभाषा !

7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. गेल्या १ वर्षापासून कोविडच्या संक्रमणानंतर तर आरोग्य चांगले असावे किंवा निरोगी असणे किती आवश्यक आहे हे सर्वांनी जाणले आहे. भरमसाठ पैसा असूनही कामाला आला नाही असे अनेक उदाहरण बघितले आपण. चांगले आयुष्य म्हणजे काय तर मनुष्य निरोगी असणे. कारण आयुष्यात आनंद उपभोगायचा असेल तर शरीराचे स्वस्थ असणे गरजेचे आहे. स्कंद पुराणात म्हटले आहे.

धर्मार्थकाममोक्षाणामारोग्यं साधनं यतः ।
तस्मादारोग्यदानेन तद्दत्तं स्यात् चतुष्टयम् ॥

धर्म अर्थ काम मोक्ष हे प्राप्त करण्याकरीता आरोग्य हेच साधन आहे. जर मनुष्य स्वस्थ निरोगी असेल तरच हे चार पुरुषार्थ प्राप्त होऊ शकतात. म्हणूनच आरोग्याला खूप महत्त्व आहे.

आयुर्वेद चिकित्साशास्त्रात देखील आरोग्य म्हणजे नक्की काय यावर चर्चा केली आहे.
सुखसंज्ञक आरोग्यं विकारो दुःखमेव च ।

निरोगी असणे हे सुखकारक आहे. तर विकार ( कोणताही असो ) शरीराला दुःख वेदना पीडाकारकच असतो.

सुश्रुताचार्यांनी स्वस्थ व्यक्ती कुणाला म्हणावे हे सांगतांना म्हटले आहे.
समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियः ।
प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थ इति अभिधीयते ॥

किती विस्तृत परीभाषा आहे ही बघा. त्रिदोष सप्तधातु मल हे सर्व सम अवस्थेत असणे त्यासोबतच आत्मा, इन्द्रिय आणि मन प्रसन्न असणे म्हणजे स्वस्थ व्यक्ति ! म्हणजेच शारिरीक व मानसिक या दोन्हीचा स्वास्थ्याच्या दृष्टीने विचार आयुर्वेदात केला गेला आहे.

योग्य आहार विहार व्यायाम निद्रा ब्रम्हचर्य यांचे पालन स्वास्थ्य टिकविण्याकरीता, निरोगी राहण्याकरीता जेवढे आवश्यक आहे तेवढेच मन प्रसन्न असणे स्वास्थ्याकरीता गरजेचे आहे.

आरोग्य चांगले रहावे काय करू शकतो तर –

  • पूर्ण झोप ( लवकर निजे लवकर उठे हा नियम पाळणे)
  • योग्य व्यायाम ( अव्यायाम आणि अतिव्यायाम टाळणे. वय ऋतुनुसार व्यायाम करणे)
  • भूक लागल्यावर जेवणे.
  • तहान भूक मल मूत्राचे वेग धारण न करणे.
  • ऋतु देश अग्नि वय यांचा विचार करून अन्न ग्रहण करणे.
  • च्यवनप्राश, सुवर्णप्राशन इ. रोगप्रतिकार क्षमता वाढविणाऱ्या रसायनांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने दिनचर्येत समावेश करणे.
  • ऋतुनुसार आहार विहारात बदल करणे.
  • प्रसन्न मनाकरीता योगप्राणायाम, आवडत्या गोष्टीत मन रमविणे. यम नियमांचे पालन करणे.

या वर्षाची थीम आहे – to build a fairer and healthier World.

कोरोनाचा सामना आपण सर्वच गेल्या वर्षापासून करतोय. चिंता भीती शोक अगतिकता हे सर्वच अनुभवतोय. पण शारीरिक मानसिक आरोग्य चांगले राहण्याकरीता आयुर्वेदाच्या या सल्ल्यांना जागतिक आरोग्य दिनानिमित्त नक्कीच आत्मसात करूया.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button