World food Day च्या निमित्ताने – आयुर्वेदाचे आहारविषयी शाश्वत विचार !

World Food Day

युनायटेड नेशन्सच्या Food and Agriculture organization (FAO) तर्फे १६ ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड फूड डे म्हणून साजरा केला जातो. भारतात आपण नेहमीच अन्न हे पूर्णब्रह्म मानत आलो आहोत. जेवतांना बोलू नये, खूप लवकर वा हळूहळू खाऊ नये, हात पाय धूवून जेवायला बसावे. अशा अनेक गोष्टी आपल्या अंगवळणी पडल्या आहेत भलेही त्यामागची कारणे माहित असो वा नसो पण प्रत्येक घरात स्वच्छतेचे, अन्न हे ब्रह्म असल्याचे बाळकडू सर्वांना मिळते. ती परंपरा अव्याहतपणे पुढच्या पिढीपर्यंत जाणे महत्त्वाचे कारण काही वर्षांनी विदेशी खाली बसून जेवणे, हाताने जेवणे, हात स्वच्छ धुणे कसे योग्य आहे यावर त्यांची रिसर्च दाखवतील व आपण म्हणू हे तर आमच्याकडे सांगितले जायचे !

आयुर्वेदात आहार हा जीवनाचा एक आधारस्तंभ सांगितला आहे. आहार शरीराला तृष्ट करणारा, बल देणारा, कांती उत्साह स्मृति अग्नि वाढविणारा सांगितला आहे. आहार जीवन रक्षा व स्वास्थ्य टिकविण्याकरीता अनिवार्य आहे. आहार कसा असावा, कसा घ्यावा, प्रत्येक घटक द्रव्य फल शाक धान्य मांस याचे गुणकर्म शरीरावर काय परीणाम होतात या सर्वांचे वर्णन त्या अनुषंगाने केले आहे. तांदळाचे प्रकार, साठ दिवसात तयार होणाऱ्या तांदळाचे गुण ( षष्टी शाली) हे त्यातील एक उदाहरण.

प्रत्येक द्रव्य सहा रसांचे आहेत व ते कोणते त्याचा शरीरावर काय परीणाम होतो. हे प्रथम मांडणारे आयुर्वेद शास्त्र आहे. मुख्य म्हणजे स्वस्थ, रुग्ण यानुसार आहार योजना आयुर्वेदात सांगितली आहे. भोजन तयार करतांना त्यावर संस्कारांनी ( तळणे, भाजणे इ.) होणारा परीणाम, विरुद्धाहार असा सर्वांगिण विचार फक्त आपल्या आयुर्वेद शास्त्रानेच केला आहे.अगदी पात्र विचार ते जेवतांना असणारी मनस्थिती हे आहाराच्या पचनावर परीणाम करतात हे प्रथम मांडणारे आयुर्वेद शास्त्र आहे.

आहार कसा असावा याकरीता वय बल अग्नि प्रकृति देश ऋतु सात्म्य या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. उदा. बाल्यावस्थेतील आहाराचे प्रमाण प्रयोजन मात्रा वेगळी असते तर तरुणावस्थेत पाचनशक्ति वेगळी म्हणून हे घटक बदल होणारच परंतु वृद्धावस्थेत पुन्हा वयाचा विचार करून आहार बदल गरजेचा ठरतो. जे लहानपणापासून आपण खात आलो आहे ते आपल्याला सात्म्य म्हणजेच पचायला त्रास होत नाही. देशानुसार म्हणजे आपण ज्या भागात राहतो तेथील अन्न ग्रहण करावे. या अर्थाने चायनीज फूड आपल्याला पचेल का ? कुठे ना कुठे विकृती निर्माण करणारच. तेच जंक फूड विषयी.

अग्नि हा मुख्य सिद्धांत आयुर्वेदाने मांडला आहे. कितीही पौष्टिक ताकद वाढविणारा असला पण पचतच नसेल तर त्या आहाराचा योग्य उपयोग होणारच नाही. त्यानंतर येईल deficiency, आजार. जठराग्नी मंद असेल तर आहाराचे पचन मंदावेल व शरीराचे पोषण व्यवस्थित होणार नाही. आयुर्वेदाने आहाराविषयी केलेला सखोल विचार कुठेच आढळत नाही. नवीन शोध लागतात काही वर्षांनी कळते की त्याचे साईड इफेक्ट आहेत मग ते वापस घेतल्या जाते. आयुर्वेद एवढे जुने असूनही सिद्धांत तंतोतत लागू पडतात. त्यामुळे आयुर्वेदाचा आहार विचार आज फूड डे च्या अनुषंगाने जाणून घेण्यासारखा आहे. आहार या विषयावर इतके वेगवेगळे पैलू आयुर्वेदात आहेत की सर्व एका लेखात लिहिणे जरा कठीणच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER