जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्याचे मा. पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वरळी परिसरात करण्यात आले वृक्षारोपण

Aaditya Thackeray - World Environment Day
  • जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तब्बल ८३ ठिकाणी १ हजार २०० पेक्षा अधिक झाडांची लागवड
  • ४८ व्या पर्यावरण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने केले ४ हजार ८०० रोपट्यांचे वाटप

आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) महाराष्ट्र राज्याचे मा. पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते आज वरळी परिसरात वृक्षारोपण करण्यात येऊन यंदाच्या मोसमातील वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर आज दिवसभरात महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रातील एकूण ८३ ठिकाणी १ हजार २०० पेक्षा अधिक झाडांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमांना मान्यवर नगरसेवक, मान्यवर नगरसेविका, मान्यवर लोकप्रतिनिधी यांच्यासह वलयांकित व्यक्तिमत्त्वांनी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. त्याचबरोबर आजच्या ४८ व्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य लक्षात घेऊन मुंबईत विविध ठिकाणी एकूण ४,८०० रोपट्यांचे वाटप देखील करण्यात आले, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

सन १९७४ पासून जगभरात
दरवर्षी ५ जून रोजी पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या परिसरातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सदैव कटिबद्ध असणारी आणि त्यादृष्टीने अव्याहतपणे कार्यरत असणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका देखील दरवर्षी पर्यावरण दिनी वृक्षारोपण करीत असते व पावसाळ्यातील वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ देखील करीत असते. याच अनुषंगाने आज बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या शृंखलेत मुख्य कार्यक्रम हा आज सकाळी वरळी परिसरातील लाला लजपतराय मार्गालगत आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी १ हजार झाडांचे ‘मियावाकी वन’ फुलविण्यात येणार असून महाराष्ट्र राज्याचे मा. पर्यावरण मंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन या वनाचा व यंदाच्या मोसमातील वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात मुंबई मध्ये स्थानिक प्रजातींची तब्बल २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प महापालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे आज एकूण ८३ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या अंतर्गत शहर भागात १८, पूर्व उपनगरांमध्ये २९ आणि पश्चिम उपनगरांमध्ये ३६ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. पश्चिम उपनगरातील जुहू परिसरात असणाऱ्या एन. एस. मार्ग क्रमांक ७ च्या लगत सुप्रसिद्ध अभिनेता श्री. अनिल कपूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

आज वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांमध्ये प्रामुख्याने सोनचाफा, सीता अशोक, तामण, बकुळ, कांचन, बहावा, पुत्रंजीवा, जांभूळ, कडूनिंब, आंबा, नारळ, करंज, वड, पिंपळ यासारख्या स्थानिक प्रजातींच्या झाडांच्या रोपटे यांचा समावेश होता, अशीही माहिती उद्यान विभागाद्वारे देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button