व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने

प्रेमाचा दिवस ! टेरेस .त्यावर हार्डशेपचे फुगेच फुगे. डेकोरेशन. मंद रंगीत प्रकाश,संगीत. खूप गुलाबाची फुलं आणि त्यामध्ये ती आणि तो ! –व्हॅलेंटाईन डे साजरा करताहेत. हे मी फक्त सिरीयल मध्येच बघितलय. माझ्या माहितीमध्ये असे सेलिब्रेशन मी बघितलेले नाही. म्हणून मला व्हाट्सअप वरचा एक मेसेज खूप आवडला, “व्हॅलेंटाईन डे से अपना उतना ही रिश्ता है….. जितना की इंग्लंड वालों का नागपंचमी से!” फ्रेंड्स ! तुम्ही सगळे कसा करता व्हॅलेंटाईन डे साजरा हे ऐकायची उत्सुकता आहे.

पण खरंच प्रेम म्हणजे काय? कुठला विचार, कुठली मनाची स्थिती? कुठले वर्तन आणि अशा या संकल्पनेची व्याख्या आजतागायत कुणीही करू शकलेले नाही. मुख्य म्हणजे यावर काथ्याकूट कमी का झाला ? पण याचा उत्तर विज्ञानाला ही कळलं नाही आणि माझ्या मानसशास्त्रातहि मला मिळालं नाही. गणितातही यासाठी सूत्र नाही तर ती केवळ एक अनुभूती आहे, अनुभव घेऊनच बघण्याची गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे,” तुमच आमचं सेम कधीच असणार नाही”. प्रत्येकाला कॉलेजमध्ये असताना किंवा कुमार अवस्थेमध्ये असणाऱ्यांना प्रेम विचारलं ,तर ते त्या त्या व्यक्तीसाठी खूप स्पेशल असं सीक्रेट असेल. प्रत्येकाचं वेगळं ! कवी ग्रेस म्हणतात,”ही माझी प्रीत निराळी, संध्येचे शामल पाणी, दुःखाच्या दंत कथेला, डोहातून बुडवून आणी…!”

फिलॉसॉफीकडे थोड बघितल्यावर दिसत की बुद्ध म्हणत असत की ,”प्रेम हा असा नजराणा आहे की जो आपण कुणालाही देऊ शकतो” आणि त्यावरच पुढे प्लेटो यांनी म्हटले आहे की ,”प्रेम ही एक अशी गोष्ट आहे, जी आपणास परिपूर्ण बनवते .नाहीतर आपण या जगात अपूर्णच राहिलो असतो , अगदी खरेय हे !

अशीच आज सकाळी पहिली काम आटोपली .मग मी माझा व्हॅलेंटाईन डे कसा असावा ते ठरवलं. त्यात पहिलं होतं माझं माझ्यावरचं प्रेम –आज कित्येक दिवसांनी मी कोमट पाण्यात पाय बुडवून बसले. हलक्या हाताने स्क्रबरने टाचा घासल्या, बऱ्यापैकी भेगाळल्या होत्या. पुसून क्रीम लावून मोजे घातले. आणि मस्त आंघोळ झालेली असल्याने नंतर भरपूर आलं ,तुळस, मिर घातलेला चहा झुल्यावर बसून घेतला. पोळ्या करताना पहिली गरम गरम पोळी भरपूर तूप लावून मस्त खाल्ली ! आणि मग आरशात बघितलं, आणि पांघरलेला सुपरवुमनचा किताब पार भिरकावून दिला, नसेल जमत मला टाइम मॅनेजमेंट, आहे मी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मधली ढ, उंची रंग नसू देत माझ्याकडे, ती ती तुलना, ती इर्षा सगळं सगळं भिरकावून दिलं मी आजपासून ! एवढे सगळे केल्याने खुशीत होते मी .त्यामुळे स्वतःकडेच बघून खुप प्रसन्न हसले आणि माझ्याच दर्पण प्रतिमेला म्हंटले ,”आय लव यू !”

आज पूजा करताना आजीची आठवण आली. ती नेहमी म्हणायची यशाची कमान तर चढती, उंच असायलाच हवी. पण त्याबरोबरच आपला विस्तारही असा होऊ द्यावा, वडाच्या झाडासारखा. त्याच्या आश्रयाला कित्येक पक्षी ,प्राणी ,वाटसरू राहतात. मी जमेल तसे हे करत आले. अजूनही नक्कीच माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझा आधार ,विश्वास वाटण्यासाठी मला आधी माझ्या प्रेमाने त्यांना जिंकाव तर लागणार होतं. हेच त्या वटवृक्षाचा प्रगल्भ प्रेम मला करायचं होतं. त्यात भेदाभेद ,उच्च नीच भाव, भाषा यांना कुठलाच फरक पडणार नव्हता.” खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” हे सांगण्यासाठी आणि प्रत्यक्षात आणण्यासाठी व्हॅलेंटाईन डे ची आपल्याला कधीच गरज नव्हती.

भक्ती ! परमेश्वरावरच्या प्रेमाची अनुभूती. परमेश्वराची भक्ती करणारे आपले संत दुसरं तिसरं काही नसून त्याच्यावर निरतिशय प्रेमच तर करत होते. म्हणून त्याला कधी लटक्या रागाने काही विशेषणे हि ते बहाल करत. आणि तसे लाडही करत. परमेश्वराच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालून चोळुन चोळून आंघोळ घालताना, लाडक्या बाळाला घालावी तसा भाव असतो मनात . नंतर सुंदर दागिने पोशाख घातल्यानंतर शेवटी कर्पूरारति. काल-परवापर्यंत मला हे कर्मकांड वाटत होतं. पण ती परमेश्वराच्या पूजेनंतर दिसणाऱ्या सुंदर रूपाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून केली जाते हे जेव्हा कळलं तेव्हा मन भरून आलं. आणि अशा भक्तीने, प्रेमभावे पुजलेला भगवंतच भक्ताच्या हाकेला ‘ओ ‘देणार ना! दररोज, कुठली भक्ती आणि कुठलं काय ! असा विचार करत असू तर संकटकाळी हात जोडून न्याय कसा मिळणार ? त्यासाठी दररोज देवाला दिसायला लागतं. ही ईश्वराप्रतीची प्रेमभक्ती, भक्तिमार्ग !

तसेच देश प्रेम ! पंतप्रधानांनी सूचना दिल्यावर लाखो घरांमधून असंख्य ज्योती जेव्हा “कोरोना गो” म्हणून पेटल्या होत्या. किती चूक बरोबर माहिती नाही. पण कोरोना बऱ्यापैकी गेला, याला शास्त्रीय आधार नाही. पण देशावरच्या संकटासाठी अवघ्या देशाने ,एकावेळी सकारात्मक केलेली कृती होती ती! त्यामुळे एकेकाला लढण्याची एक सामुहिक ताकद मिळाली हे देशावरच्या प्रेमाने शक्य झाले.

प्रेम निसर्गावर ही करावं. निसर्ग आपला गुरु, सखा, दाता ज्याच्याजवळ आपल्यासाठी विनाशर्त प्रेम आहे. त्याच्याकडून विनाशर्त प्रेम करायला तर शिकावं पण आज आपल्यावर प्रेम करायला उभ्या असलेल्या निसर्गावर कुऱ्हाड तर चालवू नाहीच नाही, उलट त्याच्या संवर्धनासाठी मदत होईल याचीच काळजी घ्यावी. फ्रेंड्स ! प्रेम जगावर करावं आणि जगण्यावर ही ! आपापल्या पद्धतीने करावं, पण करावं हे नक्की, कारण कवी कुसुमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे, “प्रीतीविण प्रासाद गमे शून्य जीवाला, येईल चितेचीचं कळा इंद्र महाला , प्रीतीस नको तख्त, नको ताजमहाल, प्रीतीस हवी प्रीती, वृथा खंत कशाला ?”

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER