प्रथा-कायद्यांना बंद करणारे आधुनिक भारताचे जनक ‘राजा राममोहन रॉय’ यांच्या जयंती निमित्त…

Maharashtra Today

बालविवाह, सती प्रथेच्या जोखडातून भारतीय स्त्रीला मुक्त करण्याकरता आंदोलन उभारणारे व भारतात उदारमतवादी आधुनिक सुधारणांचा पाया रचण्यात मोलाची भूमिका बजावणारे ‘राजा राममोहन रॉय’ (Raja Rammohan Roy)यांची आज जयंती. २२ मे १७७२ साली पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्हातील राधानगरी या गावी त्यांचा जन्म झाला. त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अरेबिक होती. त्यामुळे या भाषा शिकण्यासाठी वयाच्या अठराव्या वर्षी वडिलांनी त्यांना पाटणा येथे पाठविले. चिकित्सक वृत्तीच्या राजा राममोहन रॉय यांनी अरबी आणि फारसी भाषांबरोबरच इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते. त्यांनी श्रुती, स्मृती, पुराणांचा, कुराणाचा आणि बायबलचा सखोल अभ्यास केला. या विषयांचे तुलमात्मक अभ्यास करून त्यांच्या लक्षात आले, की विविध देवदेवता व त्यांचे अवतार यांची आणि मूर्तीची पूजा करणे अयोग्य आहे. परंतु, तत्कालीन समाजाला त्यांचे हे विचार मान्य नव्हते. त्यामुळे, आपल्या धर्मविषयक व ईश्वरविषयक उदार तत्त्वज्ञानाचा व उपासनापद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी २० ऑगस्ट १८२८ रोजी ब्राह्मो समाजाची स्थापना(founder of Brahma Samaj) केली.

भारतीय समाजातील स्त्रियांची दयनीय अवस्था पाहून व्याकूळ झालेल्या राजा राममोहन रॉय यांनी भारतातील क्रूर आणि जाचक अशा सती प्रथेला मूठमाती देण्यासाठी मोठा लढा उभारला. जिथे कुठे एखादी स्त्री सती जात असे, तेथे आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न ते करत असत. त्यामुळे समाज त्यांना हिंदू धर्मविरोधी मानू लागला. त्यांच्यावर टीकाही झाली. परंतु, स्त्रियांचे खून पाडणारी ही प्रथा बंद पाडण्यात यावी, त्यासाठी योग्य तो कायदा करण्यात यावा यासाठी त्यांनी तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांना कायदेशीर अर्ज दिला. सन १८२९ मध्ये भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद करवून घेतली.

लॉर्ड बेंटिक यांनीदेखील राममोहनांशी प्रदीर्घ चर्चा करून अखेर ४ डिसेंबर १८२९ रोजी सतीबंदीचा कायदा केला. सतीबंदीचे धोरण कायम ठेवावे म्हणून ब्रिटिश सरकार दरबारी अर्ज करण्यासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. त्या वेळी मुगल सम्राट दुसरा अकबर याने राममोहन राॅय यांना ‘राजा’ ही उपाधी बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते. राजा राममोहन रॉय यांना भारतात नवविचाराचे जनक म्हंटले जाते. त्यांनी सर्वप्रथम “ब्रह्मपत्रिका”नावाचे वृत्तपत्र सुरू केले. भारतीयांना आधुनिक पाश्चात्त्य पद्धतीचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी ते आग्रही होते. त्यांनी विविध विषयांवरील अनेक पुस्तकं लिहिली. त्यांच्या ‘वेदान्त ग्रंथ’ मुळे बंगाली गद्यलेखनाचा पाया घातला गेला. २७ डिसेंबर १९३३ साली आजारपणामुळे राजा राममोहन रॉय यांचे निधन झाले. सतीची चाल कायदेशीरपणे बंद करणारे व अनेक भाषांतून प्रावीण्य मिळविलेले थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button