विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही मनपा निवडणुकीत ११५ उमेदवार देणार – डॉ. सुभाष माने

नागरिकांसाठी आम आदमी पार्टी सक्षम पर्याय

Subhash Mane AAP -Aurangabad Municipal Corporation

औरंगाबाद : दिल्लीच्या मतदारांनी सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून आम आदमी पार्टीला तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत दिले आहे. हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्वच्या सर्व ११५ वॉर्डांत लोकाभिमुख उमेदवार उभे करून मनपा निवडणूक लढणार अाहाेत. दिल्ली तो हमारी है, अब औरंगाबाद की बारी है अशी घाेषणा देत वॉर्डनिहाय सभेला सुरुवात केली आहे, अशी माहिती आपचे शहराध्यक्ष डॉ. सुभाष माने यांनी एका दैनिकाशी बोलताना दिली.

आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तिन्ही निवडणुका विकासाच्याच मुद्द्यावर लढल्या आणि जिंकल्या. या विजयाने आपचा आत्मविश्वास वाढला असून विविध राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याचे पक्षाने जाहीर केले आहे. त्यासाठी दिल्लीप्रमाणेच निवडणुकीची तयारी केली जात आहे. डॉ. माने म्हणाले, आपचे दिल्ली मॉडेल देशभर राबवण्याचे उद्दिष्ट केजरीवाल यांनी ठेवले आहे. पर्यायी सक्षम पक्ष म्हणून आघाडी घेईल असे जनमत बनत चालले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक लढवणार व जिंकणार अशा पद्धतीने आम्ही पूर्वतयारीला लागलो आहोत.

आपचे ११५ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी अर्जांचे वितरण सुरू आहे. ९० इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. त्यापैकी २० जणांनी अर्ज भरून दिले आहेत.

भरलेले अर्ज दोन दिवसांत आमच्याकडे प्राप्त होतील. २८ फेब्रुवारीपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. महिला उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले आहे. ५ मार्च रोजी काही वॉर्डांतील पहिली उमेदवार यादी जाहीर करू.

प्रचारासाठी मुख्यमंत्री केजरीवाल येणार
आम्ही काय केले व करणार आहोत, याबाबत मतदारांच्या घरी जाऊन सांगणार आहोत. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सर्व राष्ट्रीय नेते औरंगाबादेत येणार आहेत. यासाठी वॉर्डनिहाय सभा सुरू झाल्या आहेत, असे डॉ. माने यांनी स्पष्ट केले.