शाब्बास संतोष

पडद्यावरचा डॅशिंग बॉय अर्थात संतोष जुवेकर (Santosh Juvekar) हा नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतो. गेल्यावर्षी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जे काही मराठी कलाकार पुढे आले होते त्यामध्ये संतोष जुवेकर होता.

तर कधी कधी काही वादग्रस्त निमित्ताने त्याच्याकडे माध्यमांचा कॅमेरा वळतो. मात्र गेल्या दोन दिवसात संतोष एका वेगळ्या आणि सामाजिक दृष्ट्या चांगल्या कारणाने चर्चेत आला आहे. आणि त्याच्या चाहत्यांकडून तसेच समाजातील तृतीयपंथीयां साठी काम करणाऱ्यांकडून त्याला शाब्बासकीची थाप मिळाली आहे .

त्याचं झालं असं की बऱ्याच दिवसांनी दाढी-मिशा काढलेल्या लूक मधला एक फोटो संतोषने सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यावर एका नेटकरी चाहत्याने, संतोष तू या लूकमध्ये छक्क्या सारखा दिसतोस अशी कमेंट केली. मुळातच अरे ला कारे करण्याचा स्वभाव असलेल्या संतोषने त्या ऑनलाइन वाचकाला खडे बोल सुनावत तृतीयपंथी यांविषयी आदरयुक्त भावनाही व्यक्त केली. संतोष च्या या रोखठोकपणा मुळेच तो ऑनलाइन हिरो झाला आणि त्याच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गेल्या चार ते पाच महिन्यात सगळेच कलाकार लॉकडाऊन मुळे घरी होते. या काळात शूटिंग असल्याने किंवा कोणत्याही इव्हेंटला हजेरी लावायची नसल्याने प्रत्येकाने आपला होम लूक जपला. कुणी केस वाढवले तर कुणी दाढी-मिशा ही वाढू दिल्या.

अभिनेत्री देखील त्यांच्या नॅचरल लुक मध्ये चाहत्यांसमोर ऑनलाईन लाईव्ह संवाद साधत होत्या. अर्थात सेलिब्रिटींच्या चाहत्यांसाठी ही एक वेगळी भेट होती. अनेकदा कलाकारांना त्यांचा लूक बदलत राहावे लागते. भूमिकेची तशी गरज असते. केस , वजन यामध्ये बदल करावा लागत असतो. यापलीकडे जाऊन कलाकारांना कधी तरी स्वतःच्या मनाला असे वाटते की कॅमेरासमोर कटात राहून कंटाळा आला आणि हातात काही नवीन प्रोजेक्ट नसेल तर जे करायचे राहून गेले तो प्रयोग करावा लूकवर . असं काही संतोषला वाटलं. दाढी मिशा काढून क्लीन शेव्ह केलला फोटो काढायला कोणाला आवडणार नाही. बरे, संतोष कलाकार सेलिब्रिटी असला तरी तो एक माणूस आहे. त्यालाही वाटलं की या नव्या लूक चा फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करावा. खरं तर गोष्ट इतकी साधी आणि सरळ होती ,पण एका चाहत्याने त्याला या लूकमध्ये तृतीयपंथी दिसत असल्याची प्रतिक्रिया दिली.

संतोष म्हणाला, मला तृतीयपंथी सारखा दिसतो असे म्हटले याचा राग आला नाही तर कमेंट मध्ये त्याने तृतीयपंथीयांविषयी हीन भावना व्यक्त केल्याचा राग आला. दाढी आणि मिशा काढणे हा पुरुषार्थ असतो आणि दाढीमिशा काढणे म्हणजे छक्क्या सारखे दिसणे असा त्या कमेंट चा सरळसोट अर्थ असल्याने मी त्याला धारेवर धरले.

अरे मित्रा, तृतीयपंथीयांना कमी लेखू नकोस. स्त्री आणि पुरुषांच्या शक्तीची ती एकी आहे .त्यांची ताकद समजण्यासाठी त्यांना समजून घेण्याची गरज आहे. समाजातील तृतीयपंथीयांचे आयुष्य जवळून बघ म्हणजे तुला तुझ्या पुरुषार्थाचा खरा अर्थ कळेल अशी चपराक दिली. साहजिकच प्रकरण इतके पुढे गेल्यावर त्याने आपली कमेंट डिलीट केली पण तोपर्यंत संतोषने स्क्रीन शॉट काढून तृतीय पंथीयांकडे अशाप्रकारे चुकीच्या दृष्टीने पाहणे या वृत्तीचा निषेध करत मेसेज व्हायरल केला.

मराठी मालिका सिनेमा आणि नाटक या तीनही माध्यमांमध्ये यशस्वीपणे प्रवास करणाऱ्या संतोष च्या या पोस्टची त्यावरील कमेंटचा आणि संतोषने घेतलेल्या भूमिकेचा चर्चेच्या निमित्ताने कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ट्रॉल करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांचा मुद्दा अधोरेखित झाला. सध्या संतोष काही वेब सीरिजमध्ये व्यस्त आहे. असं सासर सुरेख बाई या मालिकेनंतर इअर डाउन या मालिकेतील ही त्यांची भूमिका लोकप्रिय होती. बॉईज सिनेमातील त्याने वठवलेला शिक्षकही प्रेक्षकांना आवडला. या गोजिरवाण्या घरात, वादळवाट मालिकेतून त्याची छोट्या पडद्यावर कारकीर्द गाजली. रिंगा रिंग, पिकनिक,गडबड-गोंधळ यासारख्या अनेक सिनेमांमध्ये त्याचा अभिनय भाव खाऊन गेला आहे. मात्र सध्या एका नेटकऱ्याने तृतीयपंथीयांना कमी लेखल्याकारणावरून संतोषने दिलेला टोला हा सध्या जास्त गाजत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER