३० नोव्हेंबरला १७० संख्याबळावर आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकू – आशिष शेलार

Ashish Shelar

मुंबई : दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी केलेली सलगी म्हणजे ‘गोरा बाजार’ आणि अजित पवारांशी केलेली आघाडी म्हणजे काळा बाजार कसा? असा प्रश्न उपस्थित करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. तसेच जमेल त्या घाणेरड्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही संजय राऊत नाही, अशा शब्दात शेलारांनी राऊतांचा समाचार घेतला. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय देईल तो देईल, मात्र ३० तारखेपर्यंत आम्हाला विश्वासदर्शक ठराव जिकंण्यासाठी मुदत दिली आहे. किमान १७० संख्याबळाच्या जोरावर आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकू, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला. ३० तारखेला बहुमत सिद्ध करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ, असं आशिष शेलार म्हणाले.

तसेच आम्ही सकाळी सहा वाजता शाखेत जाणारे स्वयंसेवक आहोत, सकाळची वेळ ही रामप्रहर असते, पण जे रामाला विसरले ते रामप्रहराला काळोख म्हणत आहेत. ज्यांनी सत्तेसाठी अयोध्येत राम मंदिरला जायचं रद्द केलं, त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात आशिष शेलार यांनी राऊतांवर तोंडसुख घेतलं.

शरद पवारांच्या भेटीनंतर जयंत पाटील राजभवनात दाखल

यावेळी संजय राऊत यांचे आभार मानत ते म्हणाले की, त्यांनी इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी ही भयंकर होती, हे मान्य केलं, काँग्रेस सोबत जाण्याआधीच राऊत हे इंदिरा गांधी यांच्यावर टीका करतात त्यांचं अभिनंदन, अशी शेलकी टीकाही शेलारांनी केली.

पेढ्याची ऑर्डर दिली ते पेढे आलेच नाहीत, त्या संजय राऊत यांनी खऱ्या खोट्याची भाषा करू नये, १७० वरून १६५ वर आले आणि ३० तारखेला आणखी किती खाली येतील हे सांगता येत नाही. सोनिया गांधींवर टीका करणारी शिवसेना आज त्यांच्यासोबत जाते, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारु नये, अशा शब्दात शेलारांनी राऊतांना सुनावलं.

ज्या अजित पवार यांना विधिमंडळ गटनेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कोर्टासमोर नाकारत नाही, त्यांना आम्ही का नाकारायचं, त्यामुळे आमच्या दृष्टीने जयंत पाटील हे अधिकृत गटनेते नाहीत. विधिमंडळ नेता बदलीचं पत्र दिलं तर आमदारांची शहानिशा करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. त्यामुळे ती प्रक्रिया पार पडेपर्यंत जयंत पाटील विधिमंडळ नेते होऊ शकत नाहीत, असंही शेलार म्हणाले.