कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठावरून शिवसेनेतील भास्कर जाधव आणि मंत्री उदय सामंत यांच्यात शिमगा

रत्नागिरी :- कोकणासाठी स्वंतत्र विद्यापीठावरून सध्या कोकणात राजकीय शिमगा सुरु झाला आहे. हा राजकीय शिमगा शिवसेनेतील दोन नेत्यांमध्ये सुरु झाला आहे. राष्ट्रवादीत असल्यापासून उदय सामंत आणि भास्कर जाधव यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन सध्या शिवसेनेच्या या दोन नेत्यांमधील विसंवाद उघड झाला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोकणासाठीच्या स्वतंत्र विद्यापीठासाठी कमिटी नेमल्याचे जाहिर केले. मात्र, यावर भास्कर जाधव यांनी थेट विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करुन सामंत यांना चितपट केले. जाधव यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंत यांनी अशी कोणतीही समिती स्थापन केली नसल्याचे स्पष्ट करण्याची नामुष्की आली.

मराठी भाषा दिन : राज ठाकरेंचा ‘जादुचा प्रयोग’ ! मनसे पदाधिकारी झाले चकित

मंत्रीपद न मिळाल्याने भास्कर जाधव सध्या नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात राजशिष्ठाचार पाळला गेला नाही म्हणून भास्कर जाधवांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता त्यांच्या याच नाराजी नाट्याचा ‘पार्ट टू’ कोकण विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन पाहायला मिळत आहे. कोकणासाठी स्वंतंत्र विद्यापीठ हवे ही मागणी तशी जुनी आहे. यावर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतानी विद्यापीठासाठी आपण पुढाकार घेतल्याचे दाखवत या विद्यापीठासाठी स्वतंत्र समिती स्थापन करत असल्याचे सांगितले. कोकणातील वृत्तपत्रांमधून याबाबत बातम्याही झळकल्या. यानंतर आता कोकणासाठी स्वंतत्र विद्यापीठ महत्त्वाचे असल्याची मते नागरिकांमधूनही व्यक्त केली जात आहेत.