सीएए, एनपीआर एनआयएवरून मुख्यमंत्री उद्धवजी गोंधळले की कायदा शिकले ??

विधिमंडळाचे वादळी अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असताना राज्यातील प्रश्‍नांकडे बघायचे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय मुद्दे व कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आधी घेतलेल्या भूमिकेवर यू-टर्न घेण्याची पाळी आली. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला परंपरेप्रमाणे मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होते.आज झालेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धवजी यांची अगतिकता ठळकपणे दिसून आली.

मुख्यमंत्री उद्धवजी मोठे वाजत-गाजत दोन दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची त्यांनी भेट घेतली होती. यावेळी त्यांचे सुपुत्र आदित्य हेही त्यांच्यासोबत होते. पंतप्रधानांशी एक तास चर्चा झाल्यानंतर ठाकरे जेव्हा बाहेर आले तेव्हा प्रसिद्धीमाध्यमांना ते सामोरे गेले. त्यांनी स्पष्टपणे असे नमूद केले की सीएएला विरोध असण्याचे कारण नाही. हा नागरिकत्व सुधारणा कायदा शेजारी देशातील अल्पसंख्यांक लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भातील आहे. त्याला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही.दुसरे म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी एनपीआर ही एक व्यवस्था आहे ती आधीदेखील झालेली आहे असे सांगत त्यांनी एकप्रकारे एनपीआरचेदेखील समर्थन केले होते. त्यामुळे सीएए व एनपीआरला काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रखर विरोध असतानादेखील उद्धव यांनी ठाकरी बाणा जपला आणि दोन्हींचे बिनदिक्कतपणे समर्थन केले असे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे ठाकरे हे स्वतःच्या भूमिकेला मुरड घालत नाहीत आणि विनाकारण मित्रपक्षांच्या दबावसमोर झुकतही नाहीत असा संदेश त्यातून गेला होता,पण दोन दिवसातच मुख्यमंत्री उद्धव यांची गाडी रुळावरून घसरली.

मुख्यमंत्री उद्धवजी रात्री शुक्रवारी रात्री दिल्लीहून परतले. शनिवारी सकाळी सकाळी एका ट्विटने त्यांना जागे केले. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मनीष तिवारी यांचे ते ट्विट होते. त्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धवजी यांना चांगलेच टोले लगावले. हा कायदा काय आहे हे मुख्यमंत्री उद्धवजी यांनी आधी समजून घेतले पाहिजे आणि मगच भूमिका घेतली पाहिजे असा दणका मनीष तिवारी यांनी दिला व मुख्यमंत्री उद्धवजी यांनी दिल्लीत घेतलेली भूमिका काँग्रेसला मान्य नसल्याचे त्याद्वारे स्पष्टपणे सूचित केले. ठाकरे यांनी सीएएविरोधात भूमिका घेऊ नये असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले. सीएए आणि एनपीआरला काँग्रेसचा विरोध आहे आणि राहील असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धवजी यांना सुनावले.

राष्ट्रवादीच्या तंबूतून काही प्रतिक्रिया उमटली नव्हती त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत होते पण संध्याकाळ होता होता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वर्षावर धडकले सीएए आणि एनपीआर या मुद्द्यावर आपली भूमिका मान्य होऊ शकत नाही असे त्यांनी ठाकरे यांना बजावल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळेच आजच्या पत्रपरिषदेत मुख्यमंत्री उद्धवजी यांनी विशेषतः एनपीआरवरून गुळगुळीत भूमिका घेतली असे बोलले जाते.

मुख्यमंत्री उद्धवजी यांनी आणखी एक यू-टर्न घेतला.कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या एल्गार परिषदेचा काय रोल होता याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) करण्याचे केंद्र सरकारने आधीच ठरवले असून ती चौकशीदेखील सुरू झालेली आहे.केंद्र सरकारने ज्यादिवशी एनआयएमार्फत चौकशीची घोषणा केली त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धवजी यांनी अतिशय कठोर भूमिका घेतली होती.केंद्र सरकार अशाप्रकारे राज्यात हस्तक्षेप करू शकत नाही, राज्याच्या अधिकारांवर गदा आणू शकत नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले होते. मात्र राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने एनआयएमार्फत तपास करण्याचे पूर्ण अधिकार केंद्र सरकारला आहेत असा अभिप्राय दिला तसेच या अधिकाराबद्दल राज्य शासन कायदेशीररीत्या कुठलाही आक्षेप घेऊ शकत नाही असेही मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी एनआयए मार्फत चौकशीस सहमती दर्शविली. मात्र मित्र पक्षांपैकी विशेषता राष्ट्रवादीकडून एनआयए चौकशीला जो प्रखर विरोध केला जात आहे तो लक्षात घेतां मुख्यमंत्री उद्धवजी हे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बॅकफूटवर गेल्याचे दिसले. केंद्र सरकारने एनआयएमार्फत चौकशी करावी यास मी अनुमती दिली नाही.त्याबद्दल माझी नाराजी आजही कायम आहे. राज्य शासनाच्या तपास यंत्रणेवर केंद्राने शंका उपस्थित करणे योग्य नाही अशी विधाने मुख्यमंत्री उद्धवजी यांनी आज केली.गेल्याच आठवड्यात एनआयएमार्फत चौकशीस हिरवा झेंडा दाखविणारे उद्धव ठाकरे खरे की आजचे मुख्यमंत्री उद्धवजी खरे हा प्रश्न त्या निमित्ताने पडला.

उद्धवना झुकवले की उद्धवना शिकवले
सीएए आणि एनपीआर नेमके काय आहे हे आपण उद्धव ठाकरे यांना समजवून सांगू असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी उद्धवना सीएए समजून घेण्याचा सल्ला दिला होता. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्यक्ष भेटून ठाकरे यांच्या भूमिकेवर तीव्र हरकत घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासात ठाकरे हे पवार यांच्यासमोर झुकले की काँग्रेसकडून कायदा शिकले असा प्रश्न पडला आहे.