
एखाद्या कलाकाराच्या निधनानंतर काही वर्षांनी सिनेमा रिलीज होणे हे काही नवीन नाही. अशा सिनेमांबाबत मागे आम्ही तुम्हाला माहिती दिलीच होती. एक वर्षापासून ते दह-बारा वर्षानंतरही काही कलाकारांचे सिनेमे प्रदर्शित झालेले आहेत. या यादीत आता ओम पुरी (Om Puri) यांचेही नाव जोडले जाणार आहे. चार वर्षांपूर्वी ओम पुरी यांचे निधन झाले. मात्र त्यापूर्वीच त्यांनी या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले होते. परंतु काही कारणांनी हा सिनेमा प्रदर्शित झाला नव्हता. मात्र आता 18 डिसेंबरला थिएटरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. विशेष म्हणजे ओम पुरी यांना श्रद्धांजली म्हणून सिनेमाचे नावही बदलण्यात आले आहे.
निर्माता खालिद किडवाई (Khalid Kidwai) यांनी ‘रामभजन झिंदाबाद’ नावाने चार वर्षांपूर्वी एका सिनेमाची सुरुवात केली होती. रंजीत गुप्ता दिग्दर्शित या सिनेमात ओम पुरी, कुलभूषण खरंबदा, झाकिर हुसैन आणि स्वर्गीय जगदीप यांच्या मुख्य भूमिका आहेत. जगदीप यांचे यावर्षीच जूनमध्ये निधन झाले. ओम पुरी यांना श्रद्धांजली म्हणून निर्मात्यांनी सिनेमाचे नाव आता ‘रामभजन झिंदाबाद’ऐवजी ‘ओमप्रकाश झिंदाबाद’ असे करण्यात आलेले आहे. सिनेमाला उशीर होण्याचे कारण सेंसॉर बोर्ड आणि कोरोना असल्याची माहिती निर्माता खालिद किडवाई यांनी दिली.
किडवाई म्हणाले, सिनेमात आक्षेपार्ह संवाद आणि दृश्य असल्याचे सेंसॉर बोर्डाने म्हटले होते आणि ती दृश्ये काढून टाकण्यास आम्हाला सांगण्यात आले होते. हा एक व्यंग्यात्मक सिनेमा असल्याने त्यात समाज आणि राजकारण्यांवर व्यंग्य करण्यात आलेले आहे. त्यानंतर ओम पुरी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सेंसॉर बोर्डाने आम्हाला परवानगी दिली परंतु तोपर्यंत कोरोनाने हातपाय पसरले होते आणि थिएटर बंद असल्याने आम्ही सिनेमा प्रदर्शित करू शकलो नाही. परंतु आता थिएटर उघडली असल्याने हा सिनेमा प्रदर्शित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ओम पुरी आणि जगदीप यांना आमची ही श्रद्धांजली आहे. कारण या दोघांचा शेवटचा चित्रपट आहे. हा सिनेमा पॅरोनोमा स्टुडियोमुळेच प्रदर्शित होत आहे. प्रेक्षकांना हा व्यंग्यात्मक सिनेमा नक्कीच आवडेल असेही किडवाई यांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला