चॉकलेटी चेहरा नसतानाही बॉलिवूडमध्ये यश मिळवले होते ओम पुरी यांनी

Om Puri

बॉलिवूडमध्ये (Bollywood news) केवळ चांगला, सुंदर चेहरा असलेलेच नायक बनतात असा प्रघात होता. राज कपूर, देव आनंद, दिलीप कुमार, शम्मी कपूर ते अगदी आताच्या रणबीर कपूर आणि टायगर श्रॉफपर्यंत नायक बघितले तर हे सगळे दिसायला सुंदर नायक होते आणि आहेत. ओम पुरी (Om Puri) ते आताच्या नवाजुद्दीन आणि पंकज त्रिपाठीपर्यंत अनेकांनी अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. नाना पाटेकरनेही फक्त चेहराच महत्वाचा नसतो तर अभिनय महत्वाचा असतो हे दाखवून दिले होते. अशा स्थितीत चेहऱ्यावर व्रण असलेल्याने बॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न पाहाणे धाडसाचेच होते. मात्र ओम पुरी यांनी चेहऱ्यावर व्रण असले तरी आपल्या अभिनयाने सगळ्यांना आकर्षित करून चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आणि यश मिळवले. ओम पुरींची आठवण काढायचे कारण म्हणजे त्यांची 70 वी जयंती.

बॉलिवूडमधील मोगॅम्बो उर्फ अमरीश पुरी यांचे सख्खे बंधू आणि प्रख्यात खलनायक मदन पुरी यांचे चुलत बंधू असलेल्या ओम पुरी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 ला हरियाणाच्या अंबालातील एका पंजाबी कुटुंबात झाला होता. ओम पुरीचे वडिल भारतीय सैन्यात होते. नंतर त्यांनी रेल्वेतही काम करण्यास सुरुवात केली होती. ओम पुरींचे सर्व शिक्षण पटियालातील आजोळी झाले.

खरे तर ओम पुरी यांच्याकडे त्यांच्या जन्माची अधिकृत तारीख नाही. त्यांच्या आईने दसऱ्यानंतर दोन दिवसांनी ओम पुरीचा जन्म झाल्याचे सांगितले होते. जेव्हा ओम पुरी यांना शाळेत प्रवेश द्यायचा होता तेव्हा त्यांच्या काकांनी 9 मार्च 1950 जन्मतारीख टाकली होती. परंतु जेव्हा ओम पुरी मुंबईला आले तेव्हा त्यांनी 1950 च्या दसऱ्याची माहिती घेतली आणि 18 ऑक्टोबर ही जन्मतारीख नक्की केली.

ओम पुरींचे लहानपण अत्यंत वाईट अवस्थेत गेले. जेव्हा ओम पुरी सहा वर्षांचे होते तेव्हा रेल्वेत काम करणाऱ्या त्यांच्या वडिलांना सीमेंट चोरल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आणि त्यांची नोकरी गेली होती. त्यामुळे त्यांना रस्त्यावर यावे लागले. घर चालवण्यासाठी ओम पुरी यांनी चहाच्या टपरीवर काम करण्यास सुरुवात केली. तसेच रेल्वे ट्रॅकवरून कोळसा जमा करून तो विकण्याचेही काम केले. ओम पुरी आणि त्यांच्या भावांना शांती नावाच्या त्यांच्या मोलकरणीने वाढवले असे म्हटले जाते.

एकदा त्यांनी मुलाखतीत सांगितले, शाळेत असताना मला सैन्यात भर्ती होऊन देशाची सेवा करावे असे वाटत होते. शाळेत असताना एक दोन नाटकांमध्येही काम केले होेते. त्यानंतर जेव्हा मी कॉलेजला गेलो आणि तेथे नाटकात काम करू लागलो तेव्हा मला अभिनयातच रुची वाटू लागली. कॉलेजला असतानाच पंजाब कला मंचसाठी नाटकात काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी मी सकाळी कॉलेजमध्ये लॅब असिस्टंटची नोकरी करीत असे आणि संध्याकाळी कॉलेज करीत असे. शनिवार, रविवार आम्ही देशभरात नाटकांचे प्रयोग करण्यास जात असू. दीड वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केले आणि नंतर एनएसडीमध्ये प्रवेश घेतला.

एनएसडीमध्ये प्रवेश घेतल्यानतंर ओम पुरी यांनी तीन वर्ष तेथे प्रशिक्षण आणि काम केले. नंतर ते पुण्याच्या फिल्म अँड टेलीव्हिजन इंस्टीट्यूट ऑफ इंडियामध्ये आले. तेथे दोन वर्ष काढली. त्यानंतर 1976 मध्ये ते मुंबईला चित्रपटक्षेत्रात संघर्ष करण्यासाठी आले. विजय तेंडुलकर यांच्या घाशीराम कोतवाल नाटकावर आधारित घाशीराम कोतवाल चित्रपटात काम करून त्यांनी अभिनयाचा श्रीगणेशा केला. परंतु त्यांच्या दुर्देवाने हा चित्रपट प्रदर्शितच झाला नाही. त्यानंतर 1981 मध्ये त्यांना गोविंद निहलानी यांनी ‘आक्रोश’ चित्रपटात संधी दिली आणि ओम पुरी यांचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला. त्यापूर्वी त्यांनी भावनी भवई चित्रपटात काम केले होते. आक्रोशनंतर आलेल्या अर्धसत्यने त्यांना आणखी लोकप्रियता मिळवली. आक्रोशसाठी ओम पुरी यांना अभिनयाचा पुरस्कारही मिळाला होता.

यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. त्यांना 1981 मध्ये पहिल्यांदा आरोहण आणि नंतर 1983 मध्ये अर्धसत्य चित्रपटासाठी असा दोन वेळा अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला होता. 1990 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारही केंद्र सरकारने दिला होता. केवळ हिंदीच नव्हे तर हॉलिवूडच्या चित्रपटांमध्येही ओम पुरी यांनी काम केले आणि तेथेही आपला ठसा उमटवला होता. ईस्ट इज ईस्ट आणि सिटी ऑफ जॉय चित्रपटांचा यात समावेश आहे. याशिवाय भारत एक खोज, कक्काजी कहिन, सी हॉक्स, अंतराल, मि. योगी, तमस आणि यात्रा अशा एकाहून एक सरस मालिकांमध्येही काम केले होते.

अशा या महान अभिनेत्याला महाराष्ट्र टुडेची विनम्र आदरांजली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER