फुकुशिमा पुन्हा घेणार झेप

ऑलिंपिक काउंटडाऊन 342 दिवस बाकी

olympic

साधारण आठ वर्षांपूर्वी विनाशकारी भूकंप आणि त्सुनामीने जपानमधील फुकुशिमा शहराची पुरती वाट लावली होती. फुकुशिमा दायची अणू उर्जा केंद्राठिकाणी दूर्घटना होऊन किरणोत्सर्ग झाला होता. त्यामुळे लाखो लोकांना फुकुशिमा परिसरातील घरे सोडून जावे लागले होते तर भूकंप व त्सुनामीने 16 हजार जणांचे बळी घेतले होते.

तेच फुकुशिमा आता आठ वर्षानंतर टोकियो ऑलिम्पिकच्या निमित्ताने पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत आहे. फुकुशिमा दाईची प्रकल्पापासूनच टोकियो 2020 च्या ऑलिम्पिक ज्योतीचा प्रवास 26 मार्च 2020 रोजी सुरू होणार आहे. याशिवाय फुकुशिमा येथे टोकियो ऑलिम्पिकचे सॉफ्टबॉलचे सहा आणि बेसबॉलचा एक सामना या शहरात होणार आहे.

ही बातमी पण वाचा : भारतीय सायकलपटूंनीही जिंकले सुवर्णपदक, विश्व अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक यश

अणू अपघाताला सामोरे गेलेल्या फुकुशिमात ऑलिम्पिकच्या काही स्पर्धा घेण्यास विरोधाचा सूर उमटला आहे पण खेळांच्या माध्यमातून येथील रहिवाशांना नवी स्वप्ने देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे ऑलिम्पिक व पॕरालिम्पिक प्रचार विभागाच्या फुकुशिमा कार्यालयाचे प्रमुख ताकाहिरो सातो यांनी म्हटले आहे. आम्ही या दूर्घटनांमधून कितपत सावरलो आहोत हे दाखवून देण्याची ही संधी आहे. प्रभावीत क्षेत्र हा जपानमध्ये नाजूक मुद्दा बनला असल्याने ही चर्चा आहे. किरणोत्साराची भीती अजुनही काहींना वाटते त्यामुळे आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप होतोय. पुनर्वसन पूर्ण झालेले नसताना खेळांवर लक्षावधी खर्च करण्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण या भागातील लोकांनी या समस्यांचा सामना दीर्घकाळापासून आणि नेटाने केला आहे. अॉलिम्पिक हे काही काळापुरते आहे त्यामुळे याचा जनसांवादाचे साधन म्हणून वापर होतोय असे जपानमधील समाजशास्राचे अभ्यासक कायले क्लिव्हलँड यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : क्रिकेट ऑलिम्पिकच्या वाटेवर