‘पॉक्सो’ गुन्ह्याची शिक्षा तहकूब करून वृद्ध दाम्पत्याला दिला जामीन

POCSO Act - Bombay High Court

मुंबई : अश्विन मोहनलाल पारिख (८७ वर्षे) आणि विमलाबेन अश्विन पारिख (८१ वर्षे) या मुंबईतील वृद्ध दाम्पत्यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील (POCSO ACT) विशेष न्यायालयाने ठोठावलेली १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा तहकूब करून मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) त्यांना जामीन मंजूर केला आहे.

एका चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल दोषी ठरवून मुंबईतील ‘पॉक्सो’ न्यायालयाने या दाम्पत्यास ११ मार्च रोजी शिक्षा ठोठावली होती. लगेच १५ मार्च रोजी या दाम्पत्याने त्याविरुद्ध अपील दाखल केले. ते १८मार्च रोजी सुनवणीसाठी दाखल करून घेतले गेले होते.

या प्रलंबित अपिलात पारिख दाम्पत्याने शिक्षा स्थगिती व जामिनासाठी अर्ज केला. न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी तो मंजूर केला. त्यांना सुरुवातीस १५ दिवसांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या रोख जामिनावर सोडण्यात आले. त्यानंतर त्यांना नियमित जामीन द्यावा लागेल. अपिलाचा अंतिम निर्णय होईपर्यंत त्यांची शिक्षाही तहकूब केली गेली.

दोन्ही आरोपी खूप वृद्ध आहेत. खटला प्रलंबित असतानाही उच्च न्यायालयानेच त्यांना जामीन मंजूर केला होता व त्या सवलतीचा त्यांनी कधीही गैरफायदा घेतलेला नाही, हे विचारात घेऊन न्या. मोहिते-डेरे यांनी हा आदेश दिला. आरोपीने नेमके काय कृत्य केले याविषयी पीडित मुलीच्या साक्षीत विरोधाभास आहे. शिवाय तिने फक्त अश्विन पारिख यांच्यावरच आरोप केला होता. विमलाबेन यांच्यावर तिचा काहीच आरोप नव्हता. वैद्यकीय तपासणी करणाºया डॉक्टरची जबानी व पीडितेची जबानी यांच्यातही सुसंगतता नाही, या ओरोपींचे वकील अ‍ॅड. दिनेश तिवारी यांनी मांडलेल्या मुद्द्यांचीही न्यायालयाने नोंद घेतली. अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर ए. व्ही. सोनावणे व पीडित मुलीसाठी सरकारने दिलेल्या वकील अ‍ॅड. अमीता कुट्टीकृष्णन यांनी शिक्षा तहकूब करण्यास व जामीन देण्यास विरोध केला.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button