जुने जाऊदे मरणालागुनि…देश बदल रहा है

Team India - Editorial

Shailendra Paranjapeब्रिस्बेन कसोटीमधेही (Brisbane Test) ऑस्ट्रेलियन (Australian) क्रिकेटपटूंनी त्यांची स्लेजिंगची परंपरा कायम राखली. स्लेजिंग म्हणजे प्रतिस्पर्धी संघाच्या बँट्समनला शेरेबाजी करून त्याची एकाग्रता भंग होईल, याची खातरजमा करणे. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू स्लेजिंगसाठी कुप्रसिद्ध आहेत. त्यातूनच मग मैदानावरील अनुचित, क्रीडाबाह्य प्रसंगांमधून मैदानाबाहेरही वादविवाद होत राहतात. स्लेजिंगचे समर्थन करणारे युद्धात सारं काही क्षम्य असतं, असंही सांगतात. पण खरा खेळाडू मात्र अशा क्लृप्त्यांना बळी पडत नाही आणि आपला नैसर्गिक खेळ करून संघाला विजयाप्रत नेतो. हीच गोष्ट नव्या दमाच्या तरुण भारतीय क्रिक्रेटपटूंनी प्रत्यक्षात करून दाखवली आणि ब्रिस्बेनमधे इतिहास घडवला.

ब्रिस्बेनमधे गेल्या ३१ कसोटी सामन्यांमधे ऑस्ट्रेलिया संघ अपराजित राहिला आहे. त्यामुळे ३१ कसोटी सामन्यांनंतर आणि १९८८ नंतर ब्रिस्बेनमधे त्यांना पराभवाची चव चाखायला लावत भारतीय खेळाडूंनी कसोटी मालिकाही भारताला जिंकून दिलीय. पंतप्रधान नरेन्द्र मोदी (PM Narendra Modi), भारतरत्न सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांच्यासह अनेकांनी संघाचं कौतुक केलंय आणि ते स्वाभाविकही आहे.

शुभम गिल (Shubman Gill), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी लाजवाब फलंदाजी करून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना निष्प्रभ केलं आणि एका दिवसात सव्वातीनशे धावा टोलवताना निर्भयतेचं, बेडरपणाचं, तडफदारीचं दर्शन घडवलं. त्याआधी भारतीय संघातले पाच सहा खेळाडू दुखापतींमुळे माघार घेऊन मायदेशी परतल्यानंतर केवळ एखाद दुसरी कसोटी खेळलेले किंवा पहिलीच कसोटी खेळणाऱ्या क्रिक्रेटपटूंनी हा पराक्रम गाजवल्याने त्याचे महत्त्व काहीसे वेगळे आहे.

यापूर्वीही ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मैदानावर स्लेजिंग करत. त्यातून आपले कळीचे फलंदाज संतुलन गमावत, क्वचित के. श्रीकांतसारखा फलंदाज स्लेजिंगला प्रत्युत्तरही करायचा पण एकाग्रता ढळली की त्याचा खेळावर परिणाम होतोच. त्यामुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागायचं. अर्थात, पूर्वी पराभवाचं कारण केवळ स्लेजिंग कधीच नव्हतं पण तेही एक कारण असायचं. आता भारतीय संघ एखाद दुसऱ्या खेळाडूच्या पराक्रमावर अवलंबून नाही. क्रिकेट हा टीम गेम अर्थात सांघिक खेळ आहे आणि त्यामुळेच सर्वांनी मिळून विजयश्रीचा गोवर्धन पर्वत उचलायचा असतो. नेमके तेच ब्रिस्बेनमधे घडले आणि कांगारूंच्या उड्या मारणे बंद झाले.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी अनेकदा देश बदल रहा है, हे वाक्य वापरतात. त्यामागे जीवनाच्या सर्व क्षेत्रात विजिगिषु वृत्ती म्हणजे जिंकण्याची उर्मी निर्माण व्हावी, ही अपेक्षा आहे. तीच भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर प्रत्यक्षात उतरवली आहे. भारतात क्रिकेट हा जणू धर्मच आहे आणि क्रिकेटमधल्या यशापयशानं संपूर्ण देशात हताशतेची किंवा उत्साहाची लाट पसरू शकते. त्यामुळे ब्रिस्बेनमधल्या विजयामुळं तरुण ताज्या दमाच्या युवा खेळाडूंनी तुमच्या भूमीत येऊन तुम्हाला पाणी पाजू, हा आत्मविश्वास जागवला आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन.

अनेकदा एखादी व्यक्ती तिच्या दृष्टीनं एखादी गोष्ट साध्य करत असते. पण त्या व्यक्तीच्या कर्तृत्वामुळं समाजावरही परिणाम होत असतो. आपल्या देशात राजकारणी, खेळाडू आणि चित्रपट कलावंत-तारेतारका, यांच्यामुळे असे परिणाम वेगवेगळ्या काळात दिसून आलेले आहेत. मुळात आपला समाज व्यक्तिपूजक आहे आणि त्यामुळे तो नवनवे देव पूजेसाठी तयारही करत असतो. पण या तीन क्षेत्रांमधल्यांना हे स्थान जास्ती वेळा मिळताना दिसतं. जुने जाऊदे मरणालागुनि, या काव्यपंक्तींप्रमाणे आता काळ नव्यांचा आहे, हे सर्वच क्षेत्रातल्यांनी लक्षात घ्यायला हवं. तेच काही प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधेही दिसून आलंय.

राळेगण सिद्धी असो की हिवरेबाजार, त्या गावाला समृद्ध बनवणाऱ्या अण्णा हजारे किंवा पोपटराव पवारांचा करिष्मा टिकून आहे, हे चांगलंच झालंय. पण राजकीय पक्षातल्या अनेकांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांनी दणका दिलाय. त्यामुळे क्रिकेट असो की राजकारण, देश बदल रहा है, हे क्रिकेटसाठीच नव्हे तर देशासाठीही चांगलं चिन्हच म्हणायला हवं.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER