इथेनॉल दरवाढीचा तेल मंत्रालयाचा प्रस्ताव

इथेनॉल दरवाढी

नवी दिल्ली : चालू गळीत हंगाम २०२०-२१ साठी बी आणि सी हेवी मोलॅसिस तसेच १०० टक्के उसाच्या रसापासून बनलेल्या इथेनॉलच्या (Ethanol) दरात वाढीचा प्रस्ताव तेल मंत्रालयाने केंद्र सरकारला सादर केला आहे. बी हेवी मोलॅसिसपासून बनलेल्या इथेनॉलसाठी प्रतिलिटर तीन रुपये ३४ पैसे तर सी हेवीसाठी एक रुपये ९४ पैसे तर ऊस रसापासून बनलेल्या इथेनॉलसाठी तीन रुपये १७ पैसे वाढ करण्याची सुचना केली आहे. अतिरिक्त साखरेचे उत्पादन कमी करणे, शेतकऱ्यांचे पैसे वेळेत देण्यासह पर्यावरण संवर्धन यासाठी इथेनॉल निर्मितीचा कार्यक्रम केंद्राने हाती घेतला आहे.

केंद्रीय मंत्रालयाने २०१९-२०साठी इथेनॉलचे दर निश्चित केले होते. बी-हेवी मोलॅसिसपासून मिळणार्‍या इथॅनॉलची किंमत प्रति लिटर ५४ रुपये २७ पैसे प्रतिलिटर १०० टक्के उसाच्या रसापासून बनलेल्या इथेनॉलसाठी ५९ रुपये ४८ पैसे प्रतिलिटर तर सी हेवीपासून बनलेल्या इथेनॉलसाठी ४३ रुपये ७५ पैसे दर निश्चित केला होता. नव्याने दरवाढ सुचविताना ऊस आणि मोलॅसिसनचा दर्जा, प्रदूषण नियंत्रण उपाय योजनांचा खर्च, प्रकल्पासाठीचे व्याज आणि घसारा, प्रक्रिया खर्च, एफआरपीच्या दरात झालेली वाढ, तंत्रज्ञानाचा खर्च याचा विचार केला आहे.

इंडीयन शुगर मिल्स असोसिएशनच्या (Indian Sugar Milss Association) अंदाजानुसार मागील वर्षीची ११५ लाख मे. टन साखर शिल्लक आहे. यंदा ३०५ लाख मे. टन उत्पादीत होईल, असा अंदाज आहे. साखरेची देशांतर्गत मागणी २५० लाख मेट्रीक टन आहे. त्यानुसार पुढील हंगामात १६५ लाख मेट्रीक टन शिल्लक असेल. त्यामुळे शिल्लक साखरेचे अभुतपूर्व संकट तयार होवू शकते. त्यातून मार्ग काढण्यासाठी जैव इंधन कार्यक्रम नियोजनबध्द राबविण्याची गरज आहे. २०१८ ते २०२२ पर्यंत १० टक्के तर २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रित करण्याचे केंद्र सरकारचे उदिष्ट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER