अगं अगं लशी, मला कुठं नेशी…

Shailendra Paranjapeकरोना (Corona) रुग्णांची संख्या आता सातत्यानं कमी होताना दिसत आहे. त्याबरोबरच करोना बाधित झालेल्यांपैकी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही रोजच्या रोज वाढत असून ते ९५ टक्क्यांवर पोहोचले आहे. याचाच अर्थ असा की करोना झालेल्या रुग्णांपैकी केवळ पाच टक्के जणांना धोका होऊ शकतो आणि त्यातलेही केवळ दोनच टक्के मरणापर्यंत जाऊ शकतात.

करोना हा विषाणूजन्य रोग अचानकपणे आला आणि जगभर हाहाःकार माजवून गेला. अगदी सुरुवातीला म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर लॉक डाऊन केले गेल्यामुळे भारतात करोनानं दिलेला त्रास इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी जाणवला. अर्थात, भारतात यापूर्वी येऊन गेलेल्या क्षयरोग, पटकीसारख्या रोगांच्या मुळे भारतीयांमधे एक प्रकारची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे भारतात करोनाचा त्रास त्या तुलनेत कमी जाणवेल, असं वैद्यकीय क्षेत्रातील विशेषतः संसर्गजन्य रोगांच्या संदर्भात भारताबाहेर काम करणाऱ्या भारतीयांनीही सांगितलं होतं. पण तरीही करोनाबद्दल नंतर हळहळ करण्यापेक्षा पूर्वकाळजी घेतलेली बरी, असं सातत्याने सांगितलं गेलं आणि ते अयोग्य नाही.

करोनाचा पीक म्हणजे सर्वाधिक रोगी आढळत असलेला काळ लक्षात घेतला तरी पुण्यात दैनंदिन रुग्णसंख्या सप्टेंबर २०२० च्या महिन्यात सर्वाधिक होती आणि ती पाच साडेपाच हजाराच्या वर कधीच नव्हती. पुण्याच्या महापौरांनी हेही स्पष्ट केलंय की यानंतर करोनाची दुसरी लाट आलीच तरीही दिवसाला पाच साडेपाच हजार करोना रुग्णांची काळजी घेण्याइतकी महापालिका यंत्रणा सुसज्ज झालेली आहे.

करोनासंदर्भात दोन प्रकारचे लोक आपल्याला आपल्या दिनक्रमात भेटताना दिसतील. एक तर करोनाबद्दल निष्काळजी राहणे योग्य नाही पण त्याचा बाऊपण करता कामा नये, असं मानणारे आणि दुसरे करोनाबद्दल अतिकाळजी किंवा अतिपूर्वकाळजी घेणारे. आता करोनाचा फैलाव कमी झाल्यानंतर आणि रोगाबद्दलची सामाजिक पातळीवरची भीती कमी झाल्यानंतर पुण्याचा करोना दिवाळीच्या खरेदीच्या गर्दीत खरोखर चेंगरला गेलाय, असं मानणारे अनेक जण दिसतात.

त्याबरोबरच हे लस वगैरे आहे, ते लोकांच्या खिशात हात घालून पैसे काढण्याचा प्रकार आहे, असं मानणारेही भेटतात. पंतप्रधानांपासून सर्वच पातळ्यांवर मास्क घाला, हात धुवा आणि सुरक्षित अंतर पाळा, ही त्रिसूत्री जनतेला सांगितली जातीय. लस येईपर्यंत सावधानता बाळगायलाच हवी, हा अमिताभ बच्चन यांच्या आवाजातला प्रचार मोबाइल फोन्सवरून पुन्हा सुरू झालाय. त्यामुळे करोना आहे की गेलाय की पुन्हा येणार, याबद्दल अनेकांच्या मनात साशंकता निर्माण होतानाही दिसतेय.

करोनाबद्दलच काय पण कोणत्याच विषयात फारसे माहीत नसलेलेही अधिकारवाणीनं बोलताना दिसतील. पण सर्वात सोपा उपाय हा आहे की मुळात करोनाची लागण किंवा संसर्ग स्वतःला होऊ न देणं, ही काळजी वैयक्तिक स्वरूपाची आहे. सार्वजनिक पातळीवर व्यापक जनहितैषी भूमिका घ्यायला हवी. म्हणजे शक्य तो करोनाविषयी भीती उत्पन्न होईल, असे बोलू नये आणि सक्सेस स्टोरी किंवा करोनावर मात केलेल्यांची माहिती इतरांना सांगावी. तसंच अगदीच करोना संसर्ग झाला तरी ९५ टक्के रुग्ण बरे होताहेत, हेही आवर्जून सांगावं.

हे सारं आपण सारे करूच. पण सर्वोच्च न्यायलयानं शेतकऱ्यांचा आंदोलन करण्याचा हक्क अबाधित आहे आणि लोकशाहीत तो रहायला हवा, असंही नमूद केलंय. त्याच धर्तीवर आम्हाला लस घ्यायची नाही, असं सांगण्याचा हक्कही नागरिकांना आहे का, यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकायला हवा. कोणत्याही लशीचे दुष्परिणाम, किंवा परिणामकारकता याविषयी तज्ज्ञ मंडळीच टोकाची मतं व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे सरकारने संसदेत पारित केलेल्या कायद्याबद्दल विरोध करण्याची मुभा असेल तर पूर्ण प्रभावीपण सिद्ध न झालेली कोणतीही लस वा औषध आम्ही घेणार नाही, ही मुभा नागरिकांना असायला हवी.

रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांवर गेलेला आहे. करोनाची दुसरी लाट येइलच, असं कोणीही खात्रीनं सांगू शकत नाही. त्यामुळे गर्दीत चेंगरून मेलेल्या रोगासाठी आता लशीची गरज काय, असाही प्रश्न उपस्थित होतोच आहे. त्यामुळे तुम्हीही लशीबद्दलचा निर्णय घेण्यापूर्वी शंकाकुशंका दूर करून घ्या.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER