अरे बापरे ! पोलिसांनी ठोकली धूम

Shailendra Paranjapeसर्वसामान्यांशी रोजच्या रोज संबंध येणारं खातं म्हणजे पोलीस खातं आणि पोलीस लोकांशी कसे वागतात, त्यावरून लोक सरकारबद्दलची मतंही बनवत असतात. सरकारी पातळीवर अनेक निर्णय घेतले जातात. बहुतांश वेळा अंमलबजावणीच्या वेळी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पोलीस खात्यानं त्यात हातभार लावल्याविना अनेक निर्णय प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत. कोरोना काळात आपण सर्वांनीच हे अनुभवले आहे. कोरोना (Corona) पसरू नये म्हणून आता नववर्षाच्या स्वागतासाठी अनाठायी उत्साह दाखवत लोकांनी रस्त्यावर गर्दी करू नये, याची काळजीही पोलिसांनाच घ्यावी लागते.

प्रतिबंधात्मक कारवाईपासून ते थेट ताब्यात घेणं, प्रसंगी गुन्हा दाखल करणं, हे सारं पोलिसांना करावं लागतं ते व्यापक जनहितासाठी. मात्र, असं असलं तरीही एकुणात पोलिसांची प्रतिमा काही जनमानसात चांगली नाही. पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, याकडे लक्ष वेधल्यानंतर पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदाचा कार्यभार घेताना तीन महिन्यांत हे चित्र बदलेल, असं सांगितलं होतं. पण तसं काही झालेलं दिसत नाही. पोलीस जनतेचे रक्षक आहेत का, असा प्रश्न पडावा अशी घटना पुण्याच्या औंध भागात घडली आणि त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याची बातमीही वृत्तपत्राच्या वेबसाईटवर झळकलीय. सांगितलं तर गंमतच वाटेल की, पहाटे थंडीच्या कडाक्यात चोरट्यांनी एका सोसायटीत घरफोड्या केल्या आणि आवाजाने जाग आलेल्या नागरिकांनी पोलिसांना फोनही केला.

पोलीसही तातडीने घटनास्थळी आले. सामान्यतः मध्यरात्री, पहाटे गस्त घालताना दोन दोन कॉन्स्टेबल्स फिरत असतात. ते घटनास्थळी पोहचले पण चोरटे चार असल्याने आणि त्यांच्याकडे हत्यारं असल्याने स्वतःकडे बंदूक असूनही पोलीसच पळत सुटले. दोन पोलीस शिपायांपैकी एकाकडे बंदूक होती आणि तो चोरट्यांना बघून पळून जातोय, हे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालेय. त्याचाच व्हिडीओ व्हायरल झालाय. संबंधित सोसायटीतल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर संबंधित दोन्हीही पोलीस शिपायांवर कारवाई करण्यात येत असल्याचं पोलीस खात्यानं स्पष्ट केलंय. पण मुळात चोरांना बघून पोलीसच घाबरून पळू लागले तर नागरिकांनी बघायचं कुणाकडे, हा प्रश्न निर्माण होतो.

अनेकदा पोलिसांकडे सामान्य नागरिक गेले की जणू काही ते नागरिकच गुन्हेगार आहेत की काय असं वाटण्यासारखी वागणूक त्यांना दिली जाते, हा अनुभव आहे. सामान्य गरीब जनतेशी अरेरावीनं वागणारे पोलीस चोरांसमोर गरीब गाय कसे झाले, हे एक कोडेच आहे. पळून जाणाऱ्या पोलिसांमुळे त्यांच्या प्रशिक्षणाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यातल्या वृत्तपत्रात आणखी एक बातमी झळकलीय तीदेखील पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारीच आहे. माहिती अधिकाराचा वापर करून खंडणी मागण्यासह इतर काही आरोप असलेला रवींद्र बऱ्हाटे सर्वोच्च न्यायालयानंही जामीन नाकारल्यानंतर अद्यापही फरारीच आहे. याचाच अर्थ त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे आता त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश दिले गेलेत.

एकीकडे समोर चोर दिसल्यावर पळून जाणारे पोलीस आणि दुसरीकडे ३ ऑक्टोबरला न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर जवळपास तीन महिने होत आले तरीही सापडत नसलेला रवींद्र बऱ्हाटे…. या दोन्ही बातम्यांमधून ठळकपणे समोर येतेय ती पोलीस खात्याची अगतिकता आणि अकार्यक्षमता. पुण्याचे पोलीस आयुक्त काहीही सांगत असले तरीही गुन्हेगारांना धाक राहिला आहे का, हा प्रश्न उरतोच आहे. किंबहुना पोलिसांचा धाक गुन्हेगारांना उरलेला नाही तर तो सामान्य नागरिकांना मात्र जास्तीच आहे, हेही रोजच्या रोज अनुभवाला येतेय.

त्यामुळेच पुण्यात नववर्षाच्या जल्लोषपूर्ण स्वागतावर निर्बंध घालण्यासाठी पाच हजार पोलीस तैनात करणाऱ्या सरकारनं आधी चोरांना जेरबंद करण्याची क्षमता त्यांच्यात येईल, हे बघायला हवं. दुसरं असं की सीसीटीव्ही. हे सतत सांगितलं जातं तर रवींद्र बऱ्हाटे असो, इंग्लंडमधून नवा कोरोना अवतार घेऊन आलेले संशयित असोत, ते सापडत नाहीत, या बातम्या येतात तेव्हा हे सीसीटीव्हीदेखील केवळ सामान्य नागरिकांचे वाहतूक नियम उल्लंघनाचे अतिगंभीर गुन्हे पकडण्यापुरतेच आहे का, अशीही शंका येते. सीसीटीव्हीमधून अशा तातडीने लोकेट करावयाच्या लोकांना लवकरात लवकर शोधण्याची शक्ती पोलीस खात्यात येवो, ही शुभेच्छा.

ही बातमी पण वाचा : स्थापनादिनाला युवराज गायब…

शैलेंद्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER