“आहे मनोहर तरी, गमते उदास !”

Mansavad

तडजोड आणि स्वीकार हे दोन शब्द समानार्थी वापरले जातात .सर्वसाधारणपणे कुठल्याही गोष्टीशी ऍडजेस्ट केलं, कि ती गोष्ट स्वीकारली असा समज असतो.पण बऱ्याच गोष्टी स्वीकारल्या म्हटल्यावर ही मनातली ठुसठूस मात्र तशीच असते. आता हेच बघा ना!

सुलभा २६ वर्षाची असताना तिचे लग्न झाले. तीन महिने झाले लग्नाला . नवरा उच्चशिक्षित आहे. आर्थिक दृष्ट्या कुटुंब सुस्थितीतील आहे. घरातील व्यक्तींना बाबतही तिची कुठलीही तक्रार नाही. व्यक्ती म्हणून नवराही अतिशय चांगला असल्याचे तिने सांगितले. पण हे लग्न तिच्या मनाविरुद्ध वडिलांच्या दबावामुळे झालंय .तसं म्हणाल तर तिचे कुठे अफेअर होते किंवा कुणी मुलगा आवडत होता असेही नाही.

तर दुसरे उदाहरण अनयाचं ! ती तिचे पती आणि दोन मुले सोलापुरात राहतात. सासू-सासरे दूर त्यांच्या गावाला राहतात .पण अधून मधून काही दिवसांसाठी येतात .तिचं म्हणणं आहे की एरवी चांगला वागणारा तिचा नवरा ,आईवडील आले की बदलतो आणि त्यांच्यात वाद होतात. सासू-सासरे तसे चांगले आहेत .त्यांना फक्त मुलाचे कौतुक !त्यांच्या दोषावर पांघरूण घालून हिलाच बदलायला सांगतात.

शशांक ची वेगळीच कहाणी! सहा वर्ष झाली लग्नाला. पण दोघांच्या आवडीनिवडी पूर्ण भिन्न आहेत. तो कॉलेजला प्रोफेसर. वाचनाची ,व्याख्याने ऐकण्याची आवड. तर त्याच्या बायकोला टीव्ही सिरियल्स आणि हिंदी पिक्चर ची गाणी बघण्याचा शौक! बघून नवीन आलेल्या फॅशन आणि त्यांचे अनुकरण करायला तिला आवडतं, ही त्याची तक्रार .त्याने बराच बदलवायचा प्रयत्न केला ,पण व्यर्थ अस तो म्हणतो.

ही अशी उदाहरणे वरवर बघता खूप सोपी वाटत असली, तरी भरपूर स्ट्रेस वाढवणारी असतात. बेरोजगारीचा ताण असेल,तर घरातल्या कुटुंबीयांवर ,विशेषतः मुलांवर आपल्या पालकांना नोकरी नसल्याचे वाईट परिणाम होत असतात. एखाद्या नोकरीत अनेक वर्ष कंटाळवाणी घालवणे, म्हणजे आवडत नसलेल्या क्षेत्रात वा ठिकाणी काम करत राहणे, वैवाहिक आयुष्यात सतत वादविवाद, भांडण किंवा बरेचदा दीर्घकालीन आजाराने ताणाची परिसीमा होणे, बरेचदा लग्न टिकवायचं म्हणून सहन केलेले, नवरा-बायकोमधील ताण अखेर घटस्फोटापर्यंतही पोहोचतात.

बदललेल्या जीवनशैलीत सामाजिक बदलांमुळे घटस्फोटाचा प्रमाणही सतत वाढत आहे .भारतातील जोडपी एकमेकांबरोबर आनंदात असण्याचे प्रमाण अनेक सर्वेक्षणानुसार कमी आहे आहे ,पण सामाजिक दडपणामुळे घटस्फोटापर्यंत पोहोचत नाहीत .परंतु आपसातील या ताणामुळे नैराश्य आणि मनोविकारांच प्रमाण मात्र वाढताना दिसते.

आपण बघितलेल्या तिन्ही उदाहरण कडे थोडे नीट बघितले तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. सुलभा च्या बाबतीत सगळं काही नीट असूनही तिला ताण आहे. एकूणच या सगळ्यांच्या कहाण्या आहे “मनोहर तरी गमते उदास या पठडीतल्या !” बर्‍याच मुला-मुलींच्या मनात विवाहाविषयी जोडीदाराविषयीच्या प्रतिमा पक्क्या झालेल्या असतात. त्यामुळे त्या केवळ प्रतिमेशी न जुळणारा असा जर जोडीदार मिळाला ,तर नंतर प्रश्न उभे राहतात .आपल्या आवडणाऱ्या व्यक्तींमध्ये मित्र मैत्रिणी मधे आपल्या आयुष्यातील जोडीदाराची प्रतिमा आपण शोधत असतो. पण सगळ्या गोष्टी अनुकूल आणि मनात तयार केलेली प्रतिमा वा कल्पनेतली प्रतिमा आणि वास्तविकता यात अंतर असेल ,तर बहुदा मोठ्या वडील मंडळींकडून योग्य तो निर्णय घेऊन विवाह पार पडतो. आणि सुलभा सारखी परिस्थिती निर्माण होते. ह्यात मुला-मुलींच्या विचारांचा अनादर करण्याचा हेतू अजिबात नसतो .मुख्य म्हणजे या सर्व कल्पना प्रत्येकच वेळी परस्पर स्वच्छ शब्दात त्यांनी कधी एक तर व्यक्त केलेल्या नसतात किंवा कधीकधी त्या त्यांना स्वतःलाच स्पष्ट नसतात.

त्यामुळे वास्तवाचा मनापासून स्वीकार करून जोडीदाराचे चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न केला तर सहवासाने प्रेम निर्माण होते. त्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. विवाह म्हणजे कमिटमेंट !एकदा केल्यानंतर असा विचार करून समोरच्यावर अन्याय होत असतो.

दुसऱ्या अनयाच्या उदाहरणात ती” हम दो हमारे दो” एवढेच स्वीकारताना दिसते. आई वडिलांचा मुलावर ,त्याच्या घरावर काहीएक अधिकार असतो .आज-काल मुलीच फक्त सासरी जात नाही तर मुलेही आई-वडिलांपासून दूर असतात. अशावेळी आई-वडील आल्यावर त्यांना जास्त वेळ देणे, त्यांना आवडतील त्या गोष्टी करणे, यावर भर असू शकतो .नेहमीचे रुटीन पेक्षा नवा कुणी आलं की रूटीन मध्ये बदल होत असतो .आणि तसंही हे नातं विळा भोपळ्याच !त्यामुळे लगेच कौतुक करावं अशी अपेक्षा फोल आहे .म्हणजे त्याचा केवळ अट्टाहास असू नये. त्याच्याबरोबर जर आपणही कर्तव्य ,जबाबदारीत सहभागी होऊ शकता.आणि त्यामुळे मुलीं मधला या प्रकारचा ताण कमी होईल.फक्त दृष्टिकोन मात्र बदलावा लागेल.

शशांक सारख्या उदाहरणात ही मुळातच निवड करताना शिक्षण ,एकूण बौद्धिक स्तर याचा विचार व्हायला हवा. पण कित्येकदा असेही विवाह यशस्वी होतात. प्रत्येकच वेळेला परस्पर प्रेम आदर असण्यासाठी आवडी-निवडी, एक असणं अन सगळ्या गोष्टी एकत्र करणं आवश्यक नाही. उलट परस्परांच्या आवडीनिवडींचा आदर करत ,परस्परांना प्रोत्साहन देत ,कौतुक करत प्रेमात वाढ होऊ शकते.

सगळ्या उदाहरणांवरून दिसतं की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी मिळत नाही .त्यामुळे आपण नेहमी म्हणतो तसा परस्परांचा “विनाशर्त स्वीकार हा उत्तम उपाय आहे” .त्याला आपण unconditional acceptance , म्हणतो . त्यामुळे नातेसंबंध फुलतात .परंतु तडजोड

ही राजीखुशीने नाही ,तर मारून मुटकून केली जाते ,त्यामुळे तडजोडीने नाती दिवसेंदिवस तकलादू बनुन तुटतात.
नाते टिकवण्यासाठी तडजोड( उर्फ स्वीकार) गरजेची आहे, पण ती केव्हा आणि किती प्रमाणात करायची यालाही मर्यादा आहेत. नाहीतर ती तडजोड ‘स्वत्वाचा बळी ‘ घेणारी असते.

एकूणच लग्नानंतरच्या, दोघांमधली अनेक वैयक्तिक समस्या, परस्परांबद्दल प्रेम ,अपेक्षा, एकमेकांच्या नातेवाईकांबद्दलच प्रेम ,दोघांचेही जीवनमूल्य यासाठी विवाह पूर्व समुपदेशनाची गरज खूप वाढत चालली आहे. यातून स्वतःची ही मत स्पष्ट होतात. कुठे स्वीकार करावा लागेल ? ,तो आपल्याला कुठपर्यंत शक्य आहे ? कुठे नाही ? हे कळत जाते .त्यामुळे नंतरच्या अनंत समस्या थांबू शकतात. परंतु आजही याबाबत सजगता फार कमी आढळते. मात्र “विवाहपूर्व समुपदेशन” ही काळाची गरज बनली आहे हे नक्की !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER