तर अधिकाऱ्यांना पेन्शनपण मिळू देणार नाही : हसन मुश्रीफ यांचा दम

Officials will not be allowed to get pension Hasan Mushrif

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदार संघातील आंबेओहोळ आणि नागणवाडी हे प्रकल्प रखडले आहेत. निधी उपलब्ध होऊनही काम अपूर्णच राहिल्याने संतापलेल्या मुश्रीफ यांनी पावसाळ्यानंतर कामास गती येऊन वेळेत काम पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना पेन्शनपण मिळू देणार नाही. विभागीय चौकशी लावू असा सज्जड दमच दिला. यामुळे पाटबंधारे आणि महसूल विभागातील अधिकारी हबकून गेले. या दोन्ही प्रकल्पाच्या कंत्राटदारांना ब्लॅक लिस्ट करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीसाठी यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक के. एच. अन्सारी, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, नागलवाडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, पुनर्वसनचे उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आंबेओहोळच्या लाभक्षेत्रातील उत्तूर विभागातील २२ व गडहिंग्लज विभागातील आठ गावे अशी एकूण ३० गावे पाण्यावाचून तडफडत आहेत. नागणवाडीच्या लाभक्षेत्रातील चिकोत्रा खोऱ्यातील १८ गावांची हीच अवस्था आहे. उन्हाळा आला की इथली जनता पाण्यासाठी अक्षरशा वणवण फिरते. किमान याची तरी लाज राखा अधिकाऱ्यानी राखावी, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला.

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, नवीन प्रशासकीय मान्यता आणि पैसे आले असून वर्गही झाले आहेत. सरकारने आणि काय करायचे ? भूमिसंपादन नसल्यामुळे पॅकेज वाटपही झाले नाही. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अपूर्ण असल्याने कामही झाले नाही. त्यास महसूल व पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असतील. दोन्हीही प्रकल्पाच्या कंत्राटदारांनी पावसाळ्यानंतर प्रमुख उर्वरित कामे व घळभरणी केलीच पाहिजे, न झाल्यास तुम्हाला काळ्या यादीत टाकू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER