भाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; गृहमंत्र्यांकडून दखल

Anil Deshmukh - Raksha Khadse

मुंबई : राज्यातील प्रमुखविरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाच्या (BJP) अधिकृत वेबासाईटवरील एक गंभीर बाब उघड झाली आहे. रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची पक्षाच्या वेबसाईटवरच चुकीची ओळख सांगत आक्षेपार्ह शब्दांमध्ये उल्लेख करण्यात आल्याचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणावर आता थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दखल घेत कारवाईचा इशारा दिला आहे.

भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपा आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल, असं देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये जाहीर केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

भाजपाच्या अधिकृत वेबसाईटवर पक्षाच्या देशभरातील खासदारांची माहिती आहे. यामध्ये खासदाराचे नाव, फोटो आणि मतदारसंघाचा उल्लेख आहे. मात्र रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाचा म्हणजेच रावेरचा उल्लेख करण्याऐवजी या वेबसाईटवर ‘होमोसेक्शुअल’ असं लिहिण्यात आल्याचा दावा करणारा स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झालाय. हा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्यानंतर आता तरी रक्षा खडसे यांच्या फोटोखालील हा उल्लेख काढून तेथे मतदारसंघाचं नाव टाकून चूक सुधारण्यात आल्याचे दिसत आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रावेरचं हिंदीमधील गुगल ट्रान्सलेशन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यानं हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात अद्याप भाजापाने अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER