ज्या ५२ लोकांनी पवारांना सोडले त्यातला आमदार झाला नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास- सुप्रिया सुळे

Supriya Sule

नवी मुंबई : पुढे होणाऱ्या निवडणुकीनंतर नवी मुंबईत सत्ता परिवर्तन १ हजार १ टक्के होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे हे लिहून ठेवा, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला. तसेच पक्षात दीड वर्षांपूर्वी कोण टिकेल, कोण लढेल आणि कोण लढणार नाही अशी अवघड परिस्थिती होती. रोज उठून आज कोण पक्षातून जाणार का? याची चिंता असायची आणि कोण पक्ष सोडून गेला नाही की बरं वाटायचं. ५२ लोक शरद पवारांना सोडून गेले होते. त्यातील एकही आमदार म्हणून निवडून आला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, असा टोमणा सुप्रिया सुळे यांनी पक्षांतरण केलेल्या नेत्यांना लगावला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज (१९ फेब्रुवारी) नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या.

यावेळी त्या म्हणाल्या की, आताही राजकारणात ठाम असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांना राजकारणात ५५ वर्षे झाली. त्यातली २५ वर्ष सत्तेत गेली, तर २५ वर्षे विरोधात गेली. या ५५ वर्षांत महाराष्ट्रातील जनतेने शरद पवारांना जवळच केले. ही गोष्ट राष्ट्रवादी पक्षातील सर्वांनी कुटुंब म्हणून लक्षात ठेवायला हवी. सत्ता येत असते आणि जात असते, सत्ता ही जनतेची सेवा करण्यासाठीच असते, ती कुठल्याही पदासाठी नसते, ना लालदिव्यासाठी असते हे लक्षात घ्यायला हवे, असंही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

दरम्यान, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना साताऱ्याच्या सभेचा फोटो लक्षात ठेवा, हे सांगताना पुढचा महापौर हा महाविकास आघाडीचाच होईल, असा विश्वास सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. “भाजपच्या एका बड्या नेत्याने महाराष्ट्रात आमचा ओव्हर कॉन्फिडन्सशिवाय राष्ट्रवादीकडून केलेलं इनकमिंग नडल्याची कबुली दिल्याचा किस्सा खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितला. गणेश नाईक पक्षात असताना त्यांचा पक्षात कसा सन्मान होत होता हे सांगताना ब्लँक पेपरवर सही होऊन नवी मुंबईत उमेदवारांची नावं टाकली जात होती. नाईकांच्या घरात अन्न खाल्लं आहे. त्यामुळे अन्नाशी गद्दारी कधीच नाही. ते कसेही वागले तरी… ” असंही सुप्रिया सुळेंनी नमूद केलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते, शरद पवारांनी रिटायर्ड व्हावं. छान मार्गदर्शन केलं होतं. मात्र महाराष्ट्राने शरद पवारांना रिटायर्ड करायचं नाही हे ठरवलं होतं. त्यामुळे ‘एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा, महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस एक तरफ. ’ शरद पवार म्हटले असते, मी आता देवेंद्र फडणवीस बोलत आहेत तर रिटायर्ड होतो, परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तसं नाही. शिवाय नवी मुंबईकरांच्या मनात ‘त्या’ घोड्याची फिल्म छान झालीय. त्यामुळे ‘ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’ म्हणून आपल्याला पिक्चर बघायचा आहे, असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं ते २०१९ मध्ये भाजपचं झालं. त्यातून सेना वाचली. त्यांच्या पटकन लक्षात आलं. ‘दाल में काला है इधर से निकलो. ’ उद्धव ठाकरेंनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे आणि त्यातूनच महाविकास आघाडीची स्थापना झाली. केंद्र सरकार सव्वा वर्षात कुठलीही टीका करू शकले नाही; कारण ते जेव्हा खाली बोलतात तेव्हा त्यांना पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी महाराष्ट्रात उत्तर देते. त्यामुळे प्रत्येक जण महाविकास आघाडीचे मॉडेल देशात यायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करतोय.

ही बातमी पण वाचा : पवारांच्या त्या सभेचे गुपित अखेर सुप्रिया सुळेंनी सांगितले; म्हणाल्या…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER